मी युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषधच! राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिवसेनेला प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 17:36 IST2017-12-12T17:32:48+5:302017-12-12T17:36:28+5:30
होय, मी भाजप-शिवसेना युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषध असल्याचे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे.

मी युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषधच! राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिवसेनेला प्रत्युत्तर
नागपूर - होय, मी भाजप-शिवसेना युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषध असल्याचे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन काळात शिवसेना आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात सुरू असलेले वाकयुद्ध अजून भडकण्याची शक्यता आहे.
विखे पाटील हे विषारी औषध असल्याचे प्रसिद्धी पत्रक काल शिवसेनेने काढले होते. त्याला उत्तर देताना विखे पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार पलटवार केला. विखे-पाटील म्हणाले, "भाजप आणि उद्धव ठाकरे, हे दोघेच या सरकारचे खरे लाभार्थी असल्याचे विधान मी केले होते. सत्य हे कटू असते आणि ते उद्धव ठाकरेंना खुपल्यामुळे त्यांनी मला विषारी औषधाची उपमा दिली आहे. परंतु, ही टीका म्हणजे माझ्या कामाची पावती आहे."
यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर विखे-पाटील यांनी जोरदार टीका केली, "हे सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला बोंडअळी आणि तुडतुड्याचा रोग आहे.‘बी फॉर बीजेपी’ म्हणजे ‘बी फॉर बोंडअळी’ तसेच ‘टी फॉर तुडतुडा’म्हणजे ‘टी फॉर ठाकरे’ आहे. हे रोग नष्ट करण्यासाठी मी विषारी औषध असणे राज्याच्या हिताचे आहे आणि म्हणून मी या लोकविरोधी सरकारविरोधात विषारी औषधासारखेच काम करीत राहणार,असेही ते म्हणाले.
आतापर्यंत ९३ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणारे उद्धव ठाकरे आणि भाजप पिकांवरील किडीप्रमाणे असल्याची टीका विखे पाटील यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे विषारी औषध असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केली होती. कापूस, सोयाबीन, धान पिकावरच नव्हे तर राजकारणातही कीड लागली आहे. ते विषारी रसायन असून शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचा टोला त्यांनी लगावला होता.