"मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, तर मी अर्जुन’’, धनंजय मुंडेंनी मांडली रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 14:39 IST2025-01-19T14:28:05+5:302025-01-19T14:39:05+5:30
Dhananjay Munde News: आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण करत सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यु नाही, तर मी अर्जुन आहे, अशी रोखठोक भूमिका मांडली.

"मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, तर मी अर्जुन’’, धनंजय मुंडेंनी मांडली रोखठोक भूमिका
गेल्या महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक करड याची अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक असल्याने धनंजय मुंडे यांच्यावरही टीका होत असून, त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण करत सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यु नाही, तर मी अर्जुन आहे, अशी रोखठोक भूमिका मांडली.
यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तुस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत. आज कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यु करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच अजित दादांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, याचा आनंदच असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्व.संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे, याबद्दल धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली.