'मी CBI अधिकारी बोलतोय...', वृद्ध महिला दोन महिने डिजिटल अरेस्ट, 20 कोटी रुपये लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 20:45 IST2025-03-20T20:44:31+5:302025-03-20T20:45:16+5:30
मुंबईतील 86 वर्षीय वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्ट करुन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

'मी CBI अधिकारी बोलतोय...', वृद्ध महिला दोन महिने डिजिटल अरेस्ट, 20 कोटी रुपये लुटले
Digital Arrest : गेल्या काही काळापासून 'डिजिटल अरेस्ट'द्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. केंद्र सरकारकडून सातत्याने यासंदर्भात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय. दरम्यान, मुंबईतून अशाप्रकारचे प्रकरण समोर आले आहे. एका 86 वर्षीय महिला दोन महिने डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून 20 कोटी रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'सीबीआय' अधिकारी असल्याचे भासवत 26 डिसेंबर 2024 ते 3 मार्च 2025 दरम्यान महिलेची फसवणूक केली.
दर 3 तासांनी लोकेशन तपासायचे
या महिन्याच्या सुरुवातीला महिलेने नोंदवलेल्या पोलिस तक्रारीनुसार, तिला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले आणि तिच्या 'आधार' कार्डद्वारे बँक खाते उघडून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा दावा करण्यात आळा. आरोपीने वृद्ध महिलेला दोन महिने घरी राहण्यास भाग पाडले आणि दर तीन तासांनी फोन करुन तिचे ठिकाण जाणून घ्यायचे. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते, त्यांची ओळख पटवून सायबर पोलिसांनी महिलेचे 77 लाख रुपये वाचवले, मात्र तोपर्यंत आरोपींनी महिलेकडून कोट्यवधी रुपये लाटले होते.
सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून, महिलेला घरातच राहण्यास भाग पाडले. तिच्या कुटुंबीयांनाही अटक करण्याची धमकी दिली. 26 डिसेंबर ते 3 मार्च या कालावधीत वृद्ध महिलेने 20 कोटींहून अधिक रक्कम आरोपींना हस्तांतरित केली. हा भारतातील सर्वात मोठा डिजिटल अटक घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. दोन महिन्यांनंतर महिलेच्या घरी काम करणाऱ्या नोकराने तिच्या मुलीला वागण्यात झालेल्या बदलाची माहिती दिली आणि त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी आंतरराष्ट्रीय टोळीचा भाग आहे. आरोपींनी टेलिग्राम ॲपवर एक ग्रुप तयार केला होता, ज्यामध्ये अशा भारतीय खात्यांचे तपशील शेअर केले जात होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे ठेवले जातात. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.