आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो; राष्ट्रवादीचं नाव-चिन्ह मिळताच अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 08:21 PM2024-02-06T20:21:32+5:302024-02-06T20:23:04+5:30

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या निर्णयाने अजित पवारांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

humbly accepts the election Commissions decision Ajit Pawars first reaction after getting NCPs name and symbol | आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो; राष्ट्रवादीचं नाव-चिन्ह मिळताच अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो; राष्ट्रवादीचं नाव-चिन्ह मिळताच अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar Vs Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीनंतर राष्ट्रवादीचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. काही दिवसांत होणारी राज्यसभा निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या निर्णयाने अजित पवारांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर अजित पवार यांनी हा निर्णय आपण विनम्रपणे स्वीकारत असल्याचं सांगितलं आहे.

'महाएनसीपी' या एक्स हँडलवरून अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, "आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत." अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनीही निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर आनंद व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे की, "या निर्णयाने आम्ही अतिशय आनंदी आहोत. निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयातून भारतीय लोकशाहीवर शिक्कामोर्तब केलं आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये सामील झालो असून भविष्यात महाराष्ट्रातील जनतेचा फार मोठा पाठिंबा आणि पाठबळ आम्हाला मिळेल," असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. ज्या पक्षाची स्थापना केली त्याच पक्षाचं नाव आणि चिन्ह शरद पवार यांना गमवावं लागलं आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
 

Web Title: humbly accepts the election Commissions decision Ajit Pawars first reaction after getting NCPs name and symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.