‘या झोपडीत माझ्या...स्वप्नालीसाठी धावली माणुसकी! ‘लोकमत’ बातमीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:00 AM2020-08-25T03:00:36+5:302020-08-25T03:00:54+5:30

जिओ नेटवर्कच्या टीमने तिच्या घराच्या परिसरातील आपल्या नेटवर्कचा आवाका (रेंज) वाढविला आहे.

‘Humanity ran for my dream in this hut! The result of the ‘Lokmat’ news | ‘या झोपडीत माझ्या...स्वप्नालीसाठी धावली माणुसकी! ‘लोकमत’ बातमीचा परिणाम

‘या झोपडीत माझ्या...स्वप्नालीसाठी धावली माणुसकी! ‘लोकमत’ बातमीचा परिणाम

Next

कणकवली (सिंधुदुर्ग) : कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारिस्ते गावातील स्वप्नाली गोपीनाथ सुतार हिचे डोंगर पठारावरील ऑनलाईन शिक्षण संपादन करण्याचे अथक प्रयत्न ‘लोकमत’ने जनसामान्यांसमोर आणले. त्यानंतर स्वप्नालीकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मदतीच्या रुपाने माणुसकी अवतरल्याने ती भारावून गेली आहे.

प्राण्यांप्रती असलेल्या प्रेमापोटी स्वप्नालीने मुंबईत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाची ३ वर्षे पूर्ण केली आहेत. अजून दीड वर्षाचा कालावधी आणि त्यानंतर एक वर्षाचा अनुभव प्रशिक्षणाचा कालावधी शिल्लक आहे. सध्या कोरोनाच्या कालावधीत ती आपल्या मूळ गावी दारिस्ते येथे परतली आहे. तिथे तिचे आॅनलाईन शिक्षण सुरू आहे. हे शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी ‘लोकमत’ने ‘या झोपडीत माझ्या.. ’ या शिर्षकाखाली मांडल्या होत्या. त्यानंतर तिला मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. तिच्या आॅनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असलेला लॅपटॉप कणकवली येथील ‘आम्ही कणकवलीकर’ परिवारातर्फे श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तिला जिद्दीचे बक्षीस म्हणून सुपुर्द करण्यात आला आहे.

जिओ नेटवर्कच्या टीमने तिच्या घराच्या परिसरातील आपल्या नेटवर्कचा आवाका (रेंज) वाढविला आहे. तसेच केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना सेवा पुरविणाºया भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडने (बी.बी.एन.एल) प्रथमच दुर्गम भागात सेवा दिली आहे. या कंपनीने स्वप्नालीच्या घरात अखंडित सेवा मिळण्यासाठी जोडणी दिली असल्याची माहिती तिचे वडील गोपीनाथ सुतार यांनी दिली. विविध खात्याचे मंत्री, आमदार, खासदार तसेच उद्योगपती, दानशूर व्यक्तीनीही स्वप्नालीशी संपर्क साधत मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.

‘लोकमत’मधील वृत्त वाचून लातूरमधून मदत
महावितरणच्या लातूर विभागीय कार्यालयामध्ये स्टेनो म्हणून कार्यरत असलेले तसेच श्री गणेश पुरुष बचतगटाचे अध्यक्ष निवृत्ती सोपानराव टाले यांनी ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वाचून स्वप्नालीच्या कुटुंबियांना संपर्क केला. तसेच तिच्या बँकेच्या खात्यात ११ हजार रुपयांची मदत जमा केली आहे.

Web Title: ‘Humanity ran for my dream in this hut! The result of the ‘Lokmat’ news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.