एकनाथ शिंदेंना पत्र कसे पाठविले? उलटतपासणीत अडखळले, सुनिल प्रभूंनी विधानसभेत साक्षच बदलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 18:05 IST2023-11-29T18:05:00+5:302023-11-29T18:05:35+5:30
एकनाथ शिंदे यांना सुनिल प्रभू यांनी २२ जून २०२२ मध्ये एक पत्र पाठविले होते, ते इंग्रजीत होते. यावरूनही वकील जेठमलानी यांनी प्रभूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

एकनाथ शिंदेंना पत्र कसे पाठविले? उलटतपासणीत अडखळले, सुनिल प्रभूंनी विधानसभेत साक्षच बदलली
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी विधानसभेत जोरात सुरु आहे. शिवसेनेचे तत्कालीन पक्ष प्रतोद सुनिल प्रभू यांनी नोंदविलेल्या साक्षीवर शिंदे गटाचे वकील गेले काही दिवसांपासून उलट तपासणी घेत आहेत. यामध्ये काही आमदारांची खोटी सही आणि एकनाथ शिंदेंना पत्र कोणत्या माध्यमातून पाठविले यावर आज प्रश्न विचारण्यात आले. यावेळी सुनिल प्रभू अडकले, यामुळे त्यांनी आपली साक्षच बदलल्याचा प्रसंग घडला आहे.
एकनाथ शिंदे यांना सुनिल प्रभू यांनी २२ जून २०२२ मध्ये एक पत्र पाठविले होते, ते इंग्रजीत होते. यावरूनही वकील जेठमलानी यांनी प्रभूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच हे पत्र तुम्ही शिंदेंना कसे पोहोच केले असा सवालही त्यांनी केला. यावर आपण ते व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दिल्याचे प्रभूंनी म्हटले. याचा पुरावा सादर करू शकता का असे जेठमलानींनी विचारताच प्रभू अडकले.
यावेळी प्रभू यांनी प्रयत्न करतो असे सांगितले. तसेच माझ्या की कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून पाठविले ते तपासावे लागेल असेही प्रभू म्हणाले. यानंतर लंच ब्रेक झाला, तेव्हा प्रभू यांनी आपल्याला साक्ष बदलायची आहे असे विधानसभा अध्यक्षांना सांगत विनंती केली.
आपण एकनाथ शिंदेंना मेलवरून पत्र पाठविले होते. लंच ब्रेकमध्ये त्याची तपासणी केली तेव्हा ते लक्षात आले, यामुळे आपली साक्ष बदलायची आहे, असे प्रभू म्हणाले. याला नार्वेकरांनी संमती देत त्यांची साक्ष बदलण्यास परवानगी दिली. या मेलवरूनही जेठमलानी यांनी प्रभू यांना प्रश्न विचारले, तेव्हा हा मेल पक्ष कार्यालयातील जोशी या कर्मचाऱ्याने पाठविल्याचे प्रभू यांनी सांगितले.