Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 11:12 IST2025-08-31T11:11:16+5:302025-08-31T11:12:34+5:30
राज्यात दोन आठवड्यांपूर्वी बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची आस लागून होती. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मराठवाडा तसेच पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस झाला.

Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
नितीन चौधरी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्यात दोन आठवड्यांपूर्वी बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची आस लागून होती. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मराठवाडा तसेच पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस झाला. परिणामी राज्यात पावसाने ऑगस्टपर्यंतची सरासरी भरून काढली असून आतापर्यंत ७७८ मिलिमीटर (९६ टक्के) पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये १७ जिल्ह्यांमधील १९२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. पुढील पाच दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात आत्तापर्यंत ७७८.३ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या हा पाऊस ९६.५६ टक्के इतका आहे.
विभागनिहाय पाऊस (टक्के)
छ. संभाजीनगर: ११३
नागपूर विभागात: १०१
अमरावती: १००
कोकण: ९२
पुणे: ७९
नाशिक-विभागात: ७६
राज्यात अतिवृष्टी होतेय, कारण...
जुलै व ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. उन्हाची तीव्रता वाढल्याने पिके सुकू लागली होती. १५ ऑगस्टच्या सुमारास मध्य पश्चिम बंगालच्या उपसागरात १८ अंश उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हे क्षेत्र राज्याच्या मध्य भागातून गेल्याने मराठवाडा, विदर्भ, कोकण तसेच घाटमाथ्यावर अशा सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस झाला. चार दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरावर उत्तरेत आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्याने मॉन्सूनचे वारे सक्रिय झाले. त्यांची गती वाढल्याने राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.
राज्यातील पावसाची स्थिती
दोन शेतकऱ्यांचा मृत्यू: चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत बुडाल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
८५ कुटुंबांचा संसारच वाहून गेला: अतिवृष्टीत वासरे, (ता. अमळनेर जि. जळगाव) या गावाला फटका बसला. घरांत पाणी शिरल्याने सुमारे ८५ कुटुंबांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्या.
तीन दिवसांनी सापडला मृतदेह: धारूर (बीड)-आवरगाव येथील वाण नदीच्या पुरात वाहून गेलेल्या अनिल बाबुराव लोखंडे यांचा मृतदेह तीन दिवसांनंतर सापडला.
सेवानिवृत्त शिक्षकाचा मृतदेह सापडला: धायतडकवाडी (जि. अहिल्यानगर) शिवारात पुरात वाहून गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचा मृतदेह सापडला.