मुंबई - राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषद सभागृहात रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. या संदर्भात विधिमंडळ प्रशासनाकडूनही चौकशी सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र आता हा चौकशी अहवाल समोर आला असून त्यावर सरकार खुलासा करेल का असा प्रश्न उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी नवा दावा केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल आला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? असं त्यांनी विचारले आहे.
तसेच सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असं सांगत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टोला लगावला आहे.
अजित पवारांकडून कोकाटेंना अभय
दरम्यान, वादात अडकलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर गडांतर आले होते मात्र तूर्तास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे. यापुढे वागण्या-बोलण्याबाबत एकही चूक केली तरी घरी जावे लागेल, असा सज्जड दमही दादांनी कोकाटे यांना दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. कोकाटे राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीला हजर होते. त्या आधी अजित पवार गटाच्या मंत्र्यांची प्री-कॅबिनेट झाली. तेव्हा कोकाटे हे पवार यांच्या दालनात होते. यावेळी पवार यांनी कोकाटे यांना त्यांच्या अँटिचेम्बरमध्ये बोलविले आणि दहा मिनिटे त्यांचा क्लास घेतला. झाले ते खूप झाले. खरेतर तुमचे मंत्रिपदच काढायला हवे; पण आपले ज्येष्ठत्व लक्षात घेऊन आणि यापुढे आपण कुठलेही गैरवर्तन करणार नाही, या अटीवर तुम्हाला तूर्त मंत्रिपदी ठेवतोय. दर आठ-पंधरा दिवसांनी मला तुमच्या वागण्या-बोलण्यावर नजर ठेवावी लागेल आणि काही चुकीचे आढळले तर मंत्रिपद काढावे लागेल, असेही अजित पवार यांनी कोकाटेंना बजावलं.