मंदिरांना न जोडणारा शक्तिपीठ महामार्ग कसा ?; सांगलीतील शेतकऱ्याचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:41 IST2025-04-03T15:40:10+5:302025-04-03T15:41:41+5:30
सांगली : अनेक शेतजमिनी, वनजमिनी नष्ट करण्याचे नियोजन करीत शक्तिपीठ महामार्गाचे काम रेटले जात आहे. मात्र, आराखड्यात बहुतांश मंदिरांना ...

मंदिरांना न जोडणारा शक्तिपीठ महामार्ग कसा ?; सांगलीतील शेतकऱ्याचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल
सांगली : अनेक शेतजमिनी, वनजमिनी नष्ट करण्याचे नियोजन करीत शक्तिपीठ महामार्गाचे काम रेटले जात आहे. मात्र, आराखड्यात बहुतांश मंदिरांना कोसो दूर ठेवणारा हा महामार्ग शक्तिपीठ महामार्ग कसा होऊ शकतो, असा सवाल कवलापूर (ता. मिरज) येथील महामार्ग बाधित शेतकऱ्याने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
कवलापूर (ता. मिरज) येथे संभाजी दिनकर सावंत यांची जमीन आहे. शक्तिपीठ महामार्ग या जमिनीतून जाणार आहे. त्यामुळे या महामार्ग प्रकल्पावर सावंत यांनी हरकत घेतली आहे. दुसरीकडे त्यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून महामार्गाच्या हेतूबद्दल संशय व्यक्त केला आहे. प्रकल्पाचा आराखडा, त्याची छायाचित्रे पाठवून त्यांनी पुराव्यानिशी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
पत्रात मांडलेली निरीक्षणे
- हा रस्ता पवनार येथून चालू न होता वर्ध्याच्या पालीकडे असलेल्या झडगाव या गावाजवळून सुरू होतो.
- शक्तिपीठ माहूरगड याला हा रस्ता जोडलेलाच नाही.
- तुळजापूरला हा रस्ता कुठेही जोडला गेला नाही.
- श्री क्षेत्र औदुंबर हे ठिकाण नियोजित शक्तिपीठ महामार्गापासून कोसो दूर राहणार आहे.
- कोल्हापूरचे अंबाबाई मंदिरही या महामार्गाला जोडले गेले नाही.
महापुराचा फास आणखी आवळणार
नागपूर, रत्नागिरी तसेच पुणे ते बेंगळुरू महामार्ग कोल्हापूरच्या जवळून गेले आहेत. आता शक्तिपीठ हा तिसरा महामार्ग झाला, तर रस्त्याच्या भरावामुळे कोल्हापूर व सांगली शहराला महापुराचा फास आणखी आवळेल, असे पत्रात म्हटले आहे.
वन विभाग, रेल्वे विभागाची परवानी का नाही?
वनक्षेत्रातून तसेच रेल्वे रुळ ओलांडून जाणाऱ्या या महामार्गाच्या कामासाठी वन विभाग, रेल्वे तसेच अन्य संबंधित शासकीय विभागांच्या परवानग्या घेणे कायद्याने बंधनकारक आहे, तरीही त्या परवानग्या का घेतल्या नाहीत, असा सवाल सावंत यांनी केला आहे.
सल्लागार समिती स्थापन
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सावंत यांना दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी विविध यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात येतील, त्यासाठी महामंडळामार्फत पर्यावरणीय आघात अभ्या, वन्यजीव संरक्षण तसेच बाधित वनक्षेत्राच्या अभ्यासाकरिता सल्लागार समिती नियुक्त केली आहे.