ठळक मुद्देमालेगाव मधील रुग्णसंख्या वेगाने वाढत जाऊन 100-200- 300 अशाप्रकारे थोड्या दिवसांमध्ये 500 पार झाली.मालेगाव येथील लोकसंख्या व जीवनपद्धती विचारात घेता लॉकडाऊनची अंमलबजावणी मालेगाव शहरांमध्ये करणे आव्हानात्मक काम होते.शासन-प्रशासन व नागरिक यांनी मनावर घेतले तर कोणत्याही आपत्तीला तोंड देता येऊ शकते.

>> सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

देशभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू झालेला असताना नाशिकमध्ये मात्र अत्यंत सुखद असे ‘नो कोरोना इन नाशिक’ वातावरण मार्चच्या अखेरपर्यंत होते. सुरुवातीपासूनच केलेल्या काही नावीन्यपूर्ण उपाययोजना व त्याला नागरिकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद याचा परिणाम म्हणून आपण प्रदीर्घकाळ कोरोनामुक्त राहण्यात यशस्वी झालो होतो. परंतु २८ मार्चच्या शेवटी पहिला रुग्ण नाशिकमध्ये आढळला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मालेगावमध्ये कोरोनाचे एकदम पाच रुग्ण आढळले. यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा गतीने कामाला लागल्या.

आपले एकूण कोरोना व्यवस्थापनाचे नियोजन पूर्वीपासून चांगले असल्यामुळे सुरुवातीला याबाबत फारशी काळजी वाटली नाही. परंतु मालेगाव मधील रुग्णसंख्या वेगाने वाढत जाऊन 100-200- 300 अशाप्रकारे थोड्या दिवसांमध्ये 500 पार झाली आणि मालेगावचा समावेश राज्यातील वाढत्या रुग्ण संख्येच्या शहरांमध्ये झाला. जिल्हा प्रशासन तसेच सर्वच लोकप्रतिनिधींसाठी ही चिंतेची बाब बनली. त्या वेळेला पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी मालेगावकडे, महापालिका आयुक्त यांनी नाशिक शहराकडे व जिल्हा परिषद सीईओ यांनी उर्वरित ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित करावे असे बैठकीत सांगितले.

मालेगाव शहराची लोकसंख्या व तेथील जीवनपद्धती पाहता कोरोना संसर्ग होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी या नात्याने तेथील अनेक व्यवस्था स्थापित करण्याकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले होते. तरीही रुग्ण संख्येमध्ये इतकी भरमसाठ वाढ होईल, असा अंदाज कोणासही नव्हता. त्यामुळे या वाढीव संख्येला तोंड देण्यासाठी सर्व फेररचना करणे या कामास तातडीने अग्रक्रम दिला गेला.

जिल्हाधिकारी यांच्यावर मालेगावची जबाबदारी सोपवली गेल्यामुळे स्थानिक यंत्रणेच्या मानिसकतेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून थोडी वेगळ्या पद्धतीची प्रशासकीय रचना करण्याचे ठरवले. जिल्हास्तरावर एक इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर आधीच कार्यरत होते व त्याचा अतिशय चांगला उपयोग होता. त्याच धर्तीवर मालेगाव येथे एक स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर तातडीने सुरू करण्यात आले. शासकीय व्यवस्थेमध्ये अनेकविध कामे एकाच वेळी सुरू असतात व त्यात अनेक विभागांचा समावेश असतो. कोणी काय काम करावे याबाबत काहीवेळा संदिग्धता राहून जाते व नेमका त्याचा गैरफायदा घेऊन काही घटक काम टाळू शकतात. असे या आपत्कालीन परिस्थितीमध्ये घडू नये याकरिता सर्वप्रथम सर्व विभागांना एका छत्राखाली आणून त्या प्रत्येकाची दूरगामी कामे ठरवून दिली व त्या दूरगामी कामांचे दैनंदिन कामांमध्ये विभाजन करून पूर्ततेबाबत जबाबदारी निश्चित करण्यात आली. ह्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाल्यावर या सर्व कामकाजाचे योग्य संकलन व समन्वय होणेसुद्धा गरजेचे वाटल्याने ती जबाबदारी या डॉ.पंकज आशिया या स्वतंत्र अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली. या व्यवस्थेमुळे सर्व अधिकारी एका छत्राखाली आले सर्वांना त्यांच्या कामकाजाची रूपरेषा मिळाली व ते करीत असलेल्या कामाची संख्यात्मक व गुणात्मक माहिती आशिया यांच्या माध्यमातून दररोज मुख्यालयाला प्राप्त होऊ लागली. त्या माहितीचे अवलोकन मुख्यालयाच्या स्तरावरील आम्हा सर्व अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे करता येऊ लागले व पुढील कार्यवाही दिशा ठरवता येऊ लागली. एकंदरीतच इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर हे मालेगावसाठी खूप उपयोगी ठरले.

मालेगाव येथील लोकसंख्या व जीवनपद्धती विचारात घेता लॉकडाऊनची अंमलबजावणी मालेगाव शहरांमध्ये करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. पोलीस बंदोबस्त देणे हे जसे आव्हान होते तसेच नागरिकांना योग्य सोयी-सुविधा पुरवणे व विशेष करून रमजानच्या महिन्यामध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यादृष्टीने पेशंटचा रहिवास विचारात घेता अतिशय योग्य प्रकारे कंटेनमेंट झोनची रचना करण्यात आली. हे कंटेनमेंट झोन खूप मोठे अथवा खूप छोटे होणार नाहीत याची विशेष काळजी घेण्यात आली. तसेच त्या झोनमध्ये सर्व जीवनावश्यक गोष्टी नागरिकांना वेळेमध्ये मिळतील अशा प्रकारे किराणा, दूध, वैद्यकीय सेवा अशा सर्व वस्तूंसाठीची ठिकाणे निश्चित करून देण्यात आली. या सर्वांचे जिओटॅग फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओ वेळोवेळी घेण्यात आले. समन्वय साधणे करता स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली. या प्रदीर्घ काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अत्यंत सुरळीत राहिला हे या सर्व व्यवस्थेचे यश आहे.

कोरोना व्यवस्थापन हे सर्व प्रशासकीय व्यवस्थेसाठी अभूतपूर्व काम असल्यामुळे त्याबद्दल जसजसे प्रश्न समोर येत तसतसे त्याचे निराकरण करणे गरजेचे झाले होते. तरीदेखील भविष्यात येणाऱ्या बाबींचे पूर्वानुमान चर्चांमधून लावून त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचे सूक्ष्म नियोजन जिल्ह्यासाठी व मालेगावसाठी सतत केले जात होते. नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष कार्यवाही होते किंवा कसे हे बघण्याकरता माहितीचे आदान-प्रदानची अतिशय सक्षम व्यवस्था डिजिटल पद्धतीने करण्यात आली होती. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरद्वारे नेमून दिलेल्या कामांच्या पूर्ततेचे अहवाल दररोज जिल्हाधिकारी यांचेकडे टेलिग्रामद्वारे सादर करणे अनिवार्य होते. त्या अहवालात जर एखाद्या अधिकाऱ्याचे काम कमी दिसून आले तर त्या अहवालाच्या स्क्रीन शॉटवरच लाल शेरा देऊन ते समन्वयक यांचेकडे सायंकाळी पाठवले जात जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्यामध्ये सुधारणा होईल. अशाप्रकारे सुरुवातीपासून दैनंदिन नियंत्रण ठेवले गेल्यामुळे हळूहळू लाल शेऱ्यांचे प्रमाण कमी होत गेले व शेवटी रोजच्या रोज कामांचा निपटारा करणे हे सर्व अधिकाऱ्यांना सवयीचे झाले.

मालेगाव नाशिक पासून जवळपास शंभर किलोमीटर दूर असल्याने त्या ठिकाणी साधनसामग्रीची वानवा असणे स्वाभाविक होते. विशेष करून त्याठिकाणी अधिकारीवर्ग कमी प्रमाणात उपलब्ध होता. साधन सामुग्री देखील अल्प प्रमाणात उपलब्ध होती. प्रथमत: मालेगाव जणू मुख्य केंद्र समजून जिल्हा स्तरावरील सर्व सामुग्री तिकडे पाठवायला सुरुवात करण्यात आली. मालेगाव मधील समस्या इतकी ठळकपणे जगाच्या समोर आले की सर्वांचेच लक्ष तिकडे वेधले गेले होते. अशा वेळेला प्रशासकीय पातळीवरून केल्या जाणार्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींकडून पाठिंबा मिळणे ही गोष्ट फार मोलाची होती. मुख्य सचिव, पालक सचिव, विभागीय आयुक्त हे सर्वच वरिष्ठ अधिकारी मालेगाव कडे विशेष लक्ष देत होते. पावरलूम सुरु  करणे असो अथवा लॉक डाऊन उठवताना उपस्थित झालेले मुद्दे असोत, हे सर्व मोठे निर्णय खूप शीघ्रतेने घेण्यात आले.           

मालेगाव येथील लोकसंख्या तसेच जीवन पद्धती ही विशिष्ट प्रकारची आहे. सुरुवातीला तर एकंदरीत कोरोना या विषयाबद्दल या भागात खूप गैरसमज असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिक सर्वेक्षणांमध्ये देखील सहकार्य करीत नसत. त्यातून आजारी रुग्णांची माहिती संकलित करण्यात देखील मोठी अडथळ्यांची शर्यत करावी लागली व त्याचे दुर्दैवी दुष्परिणाम काही नागरिकांना सहन करावे लागले. ही बाब विचारात घेऊन हळूहळू स्थानिक नागरिकांच्या मनावर प्रभाव टाकू शकणाऱ्या व्यक्तींचे सहकार्य घेण्याचे ठरवण्यात आले. त्याकरता स्थानिक महत्वाचे लोक विशेषता धर्मगुरू, वैद्यकीय व्यावसायिक व्हिडिओ रेकॉर्ड करून ते मोठ्या प्रमाणावर विविध माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन नागरिक हळूहळू या सर्व उपाय योजनांमध्ये सहभागी होऊ लागले.  रमजानचे रोजे सुरू असताना स्वॅब घेताना रोजा मोडेल किंवा काय अशी शंका व्यक्त होत असल्यामुळे सेहरी किंवा इफ्तारी दरम्यान स्वॅब घेण्यावर घेणावर भर दिला. त्याचप्रमाणे आजाराचे निदान करण्यासाठी एक्स-रे ची अतिरिक्त सुविधा देखील मालेगाव येथे सुरू करण्यात आली.

मालेगावबाबत सुरुवातीपासूनच अनेक गैरसमज पसरलेले असल्यामुळे या ठिकाणी घडलेली कोणती घटना ही अतिरंजित करून अन्य ठिकाणी सांगितली जात असे. बऱ्याच वेळेला तर कोणतीही वाईट घटना घडलेली नसतानासुद्धा अशी घटना घडली असल्याचे चित्र रंगवले जात असे. त्यामुळे वास्तविक काय सुरू आहे याची व्यवस्थित माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे दृष्टीने व आरोग्य व्यवस्थेवर लोकांचा विश्वास स्थापित करण्याचे दृष्टीने वृत्तपत्र, प्रसारमाध्यमे, खाजगी चॅनेल्स या सर्वांना वेळोवेळी स्वत: व्हिडिओद्वारे, ऑडिओद्वारे अथवा मेसेज देऊन सद्यस्थितीबाबत अवगत करीत असे. या पद्धतीमुळे अनिधकृत माहिती अथवा अफवांना आपोआपच पायबंद बसला. काही वेळेला सकृद्दर्शनी दिसणाऱ्या आकडेवारीतून चुकीचे निष्कर्ष देखील काढले जातात. त्यामुळे माहितीचा योग्य अर्थ लावणे देखील गरजेचे असते.

पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ.आरती सिंह यादेखील पूर्णवेळ मालेगाव येथे उपलब्ध होत्या. टप्प्यामध्ये सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्वत:हून मालेगाव येथे काम करण्याची तयारी दर्शवली व समन्वयाची भूमिका प्रभावीपणे पार पाडली. स्थानिक पोलीस अप्पर अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या घरामध्ये त्यांच्या नूतन बाळाचे आगमन या दरम्यान झाले. कर्तव्यावर असल्यामुळे आपल्या बाळांना जन्म झाल्यानंतर तातडीने ही मंडळी भेटू शकली नाहीत. त्याची कोणतीही खंत न बाळगता त्यांनी कर्तव्याकडे लक्ष दिले. डॉ हितेश महाले हे मध्यंतरी आजारी होऊन सुद्धा अत्यल्प काळात पुन्हा हॉस्पिटलमध्ये रुजू झाले व आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्ण बरे करण्याच्या कामी लागले. मुख्यालय असलेल्या अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख पार पाडली. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये काम करणारे जवळपास सर्व अधिकारी हे पूर्णवेळ मालेगाव येथे थांबून त्यांना नेमून दिलेल्या कामाकडे लक्ष देत होते. अहवाल पाठवत होते व त्यावर दिलेल्या सूचनांची पूर्तता करत होते.

एकेकाळी एक मोठे आव्हान म्हणून सर्वांसमोर उभी ठाकलेली मालेगाव येथील परिस्थिती वरील सर्व प्रयत्नांचा भाग म्हणून आज एक यशोगाथा म्हणून समोर येत आहे व इतरांसाठी सुद्धा एक मार्गदर्शक ठरू पाहत आहे. कोरोना व्यवस्थापन ही एक जटील प्रक्रिया आहे व त्यामध्ये अनेक विभागातील अनेक ज्येष्ठ कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्या मोठ्या योगदानातून आज परिस्थिती नियंत्रणात आलेली दिसत आहे. मालेगावमध्ये राबवलेल्या प्रत्येकाचेच ते निर्विवाद श्रेय आहे.

शासन-प्रशासन व नागरिक यांनी मनावर घेतले तर कोणत्याही आपत्तीला तोंड देता येऊ शकते हेच या निमित्ताने अधोरेखित व्हावे !

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: How govt worked in Malegaon to control coronavirus Nashik Collector shares experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.