आमदार दिलीप मोहितेंवरील हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 16:10 IST2021-04-24T16:05:48+5:302021-04-24T16:10:40+5:30
honeytrap CrimeNews Satara : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेले हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस आले. विशेष म्हणजे एका युवतीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला असून या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोघांचा तर साताऱ्यातील एकाचा समावेश आहे.

आमदार दिलीप मोहितेंवरील हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस
सातारा: पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेले हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस आले. विशेष म्हणजे एका युवतीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला असून या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोघांचा तर साताऱ्यातील एकाचा समावेश आहे.
शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयुर साहेबराव मोहिते-पाटील (वय ३५, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, या संशयितांनी साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून बदनामीच्या भितीने त्यांच्याकडून लाखो रूपयांची माया गोळा करण्याचा डाव आखला होता. त्या बदल्यात त्या युवतीला काही रक्कम संशयितांनी दिली होती. मात्र, त्या युवतीनेच संशयितांचा भांडाफोड करून हे प्रकरण उघडकीस आणले.
दि. २२ एप्रिल रोजी साताऱ्यातील त्या युवतीने मयुर यांना फोन करून या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने सातारा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला. त्या युवतीने चौकशीत दिलेली माहिती अशी की, साताऱ्यात राहणारा सोमनाथ शेडगे हा तिचा मित्र असून त्याच्या ओळखीने शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे दि.१२ एप्रिल रोजी साताऱ्यात संबंधित युवतीला भेटण्यासाठी आले.
त्यांनी तिला आपल्याला आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. त्याबद्ल्यात संशयितांनी त्या युवतीला काही रोख रक्कम व पुण्यात एक फ्लॅट देण्याचे कबुल केले. त्यासाठी तुला त्यांच्याकडे नोकरीच्या बहाण्याने जायचे असून त्यानंतर त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांची बदनामी करावी लागेल, असा प्लॅन संशयितांनी युवतीला सांगितला. त्याबदल्यात तीला वेळोवेळी एकूण ९० हजार रूपये देण्यात आले.
मात्र, हा सगळा प्रकार मनाला न पटल्याने त्या युवतीने आमदारांचे पुतणे व तक्रारदार मयुर यांना फोन करून सांगितले, त्यानंतर एकच खळबळ उडाली. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तत्काळ संबंधित युवतीकडे कसून चौकशी करून यातील काही महत्त्वाचे पुरावे हाती घेतले. त्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला.याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नव्हती.
युवतीच्या मित्राचाही पैशांमध्ये वाटा!
युवतीचा मित्र सोमनाथ शेडगे याला संशयित आरोपी पैसे देत होते. यातील काही पैसे सोमनाथ शेडगे हा स्वतःजवळ ठेवायचा. त्यानंतर उरलेली रक्कम तो संबंधित युवतीकडे देत होता, असे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.