'कोरोना गो'चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा; अनिल देशमुखांकडून आठवलेंना सदिच्छा!
By Ravalnath.patil | Updated: October 28, 2020 19:48 IST2020-10-28T19:47:19+5:302020-10-28T19:48:06+5:30
Anil Deshmukh : सध्या रामदास आठवले यांची प्रकृती ठीक आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात ते दाखल झाले आहेत.

'कोरोना गो'चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा; अनिल देशमुखांकडून आठवलेंना सदिच्छा!
मुंबई : कोरोना व्हायरस विरोधात 'गो कोरोना, कोरोना गो' अशी घोषणा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रामदास आठवले यांनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, रामदास आठवले लवकर कोरोनामुक्त व्हावेत, यासाठी त्याचे अनेक मित्र, शुभचिंतक त्यांना शुभेच्छा देत आहेत.
रामदास आठवले हे कुठल्याही राजकीय परिस्थितीवर कवितेतून भाष्य करण्याबाबत प्रसिद्ध आहेत. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही रामदास आठवले यांच्याच खास स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल देशमुखांनी आठवलेंना चारोळीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
"कोरोना-गोचा घेतला ज्याने वसा,
ग्रासले त्याच कविमित्र रामदासा ll
धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका,
कोरोनात नाही दम इतका, जो तुम्हा लावील धक्का ll
रामदास आठवले लवकर बरे व्हा." असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.
'कोरोना-गो'चा घेतला ज्याने वसा,
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 28, 2020
ग्रासले त्याच कविमित्र रामदासा ll
धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका,
कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का ll@RamdasAthawale लवकर बरे व्हा. 🌹
दरम्यान, सध्या रामदास आठवले यांची प्रकृती ठीक आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात ते दाखल झाले आहेत. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. याशिवाय,
रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे रिपाइंच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
आठवलेंच्या उपस्थित पायल घोषचा पक्षप्रवेश
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोषने गेल्या सोमवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात पायलने रिपाइंचा झेंडा हाती घेतला असून पक्षाचे संघटना वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे. रामदास आठवले यांनी पक्षाच्या महिला उपाध्यक्षपदी पायल घोषची नेमणूक केली आहे.
राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती
राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री अनिल परब, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.