खुर्शिपारमध्ये ऐतिहासिक राजकीय भूकंप! लोकांतून निवडून आलेल्या सरपंचाला लोकांनीच पाडले, ६६० विरुद्ध ० मतांनी सरपंचांची उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 16:14 IST2026-01-31T16:14:03+5:302026-01-31T16:14:33+5:30
Khurshipar Grampanchayat news: "एकाही गावकऱ्याचा पाठिंबा नाही! खुर्शिपारच्या सरपंचांचा ६६०-० ने ऐतिहासिक पराभव; वाचा सविस्तर काय घडले..."

खुर्शिपारमध्ये ऐतिहासिक राजकीय भूकंप! लोकांतून निवडून आलेल्या सरपंचाला लोकांनीच पाडले, ६६० विरुद्ध ० मतांनी सरपंचांची उचलबांगडी
आमगाव (गोंदिया): आमगाव तालुक्यातील खुर्शिपार ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्याचा अखेर धक्कादायक अंत झाला. सरपंच हेमलता चव्हाण यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव तब्बल ६६०-० अशा ऐतिहासिक फरकाने मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे, सभेला उपस्थित असलेल्या एकाही मतदाराने सरपंचांच्या बाजूने मतदान केले नाही, ज्यामुळे चव्हाण यांना आपले पद गमवावे लागले आहे.
१९ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंचांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. तहसीलदारांच्या उपस्थितीत आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी आपला रोष मतदानातून व्यक्त केला.
सरपंचांवर झालेले गंभीर आरोप
ग्रामसभेत सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी सरपंचांच्या 'मनमानी' कारभाराचा पाढाच वाचला. प्रामुख्याने खालील आरोपांमुळे गावकऱ्यांमध्ये संताप होता:
अनधिकृत प्लॉटिंग: शासकीय जमिनीचे बेकायदेशीर प्लॉटिंग करून आर्थिक व्यवहार करणे.
भ्रष्टाचार: विकासकामात सदस्यांना डावलणे आणि कामांसाठी पैशांची मागणी करणे.
धमकावणे: वकिली पेशाचा धाक दाखवून गावकऱ्यांना धमकावणे आणि विरोधात बोलणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवणे.
बचाव पडला फिका
माजी सरपंच हेमलता चव्हाण यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर अन्याय होत असून जातीपातीचे राजकारण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी त्यांना स्वतःचे मतही राखता आले नाही. ६६० विरुद्ध ० असा निकाल लागताच गावकऱ्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून जल्लोष केला.