Hinganghat Burn Case: The government will bring justice to the victim faster - Chhagan Bhujbal | Hinganghat Burn Case: सरकार पीडितेला जलद न्याय मिळवून देईल - छगन भुजबळ

Hinganghat Burn Case: सरकार पीडितेला जलद न्याय मिळवून देईल - छगन भुजबळ

मुंबई : हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेची सात दिवसानंतर मृत्यूची झुंज आज अपयशी ठरली. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून अनेक स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच, याबाबत राजकीय नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही ट्विट करत पीडितेला श्रद्धांजली वाहली आहे.  छगन भुजबळ म्हणाले, "हिंगणघाट प्रकरणातील पीडित भगिनीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली असून या भगिनींचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. महाराष्ट्र हा माता भगिनींचा सन्मान करणारे राज्य असून समाजातील ही विकृत प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे." याचबरोबर, "शासन या पीडित भगिनीला जलद न्याय मिळवून देईल. तसेच त्यांच्या कुटुंबियांना मदत उपलब्ध करून दिली जाईल. मी पिडीत भगिनींच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," असे छगन भुजबळ यांनी ट्विट केले  आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल असे म्हटले आहे. तसेच नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. 'हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य अशीच आहे. विकृत हल्ल्यात जखमी भगिनी मृत्युशी झुंजत होती. उपचारांचीही शर्थ केली. पण काळाने घाला घातलाच. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याची निर्देश देण्यात आले आहेत' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच, आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल. असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही, असा कायदा करू. हैदराबादपेक्षा कडक कायदा करू. नागरिकांनी संयम बाळगा' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 

दरम्यान, गेल्या सोमवारी वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका तरूण शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. या पीडित तरुणीसाठी संपूर्ण राज्यातून प्रार्थना सुरू होत्या. डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते. मात्र, तिची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती. 7 फेब्रुवारीला तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही आणि अखेर तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. 

काय आहे प्रकरण?
पीडित तरूणी व आरोपी एकाच गावचे आहेत. आरोपी हा तरुणीपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी हे दोघेही हिंगणघाटला सहप्रवासी होते. एकाच गावातून दररोज बसने ये-जा असल्याने दशकापासून त्यांची मैत्री होती. उच्च शिक्षणासाठी पीडिता वर्ध्याला गेल्यावर या मैत्रीत खंड पडला. यादरम्यान विकेशचे लग्न झाले. शिक्षण आटोपून पीडिता हिंगणघाट येथील एका खासगी महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकविण्यासाठी रूजू झाली. या दरम्यान आरोपी विकेशने मैत्री कायम ठेवण्यासाठी पीडितेकडे आग्रह धरला होता. तीन महिन्यांपूर्वी पीडितेच्या पित्याने विकेशला समजविण्याचा प्रयत्न केला. यावरून तो चिडला होता. माझ्याशी व्यवस्थित वागत असताना वडिलांना माहिती का दिली यावरून विकेश चिडला होता. तेव्हापासूनच तो सूड घेण्याच्या मनस्थितीत होता. त्यानंतर आरोपीने पीडितेला पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यात ती गंभीररित्या जखमी झाली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Breaking : SC/ST अ‍ॅक्ट: अटकेसाठी चौकशीची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Hinganghat Burn Case : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी देणार - अनिल देशमुख

हिंगणघाट जळीत प्रकरणामधील पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे

'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा', पीडितेच्या वडिलांचा संताप

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

Web Title: Hinganghat Burn Case: The government will bring justice to the victim faster - Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.