शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत 'हिंदवी स्वराज्य महोत्सव'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 01:53 PM2024-02-15T13:53:35+5:302024-02-15T13:53:54+5:30

तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे.

'Hindvi Swarajya Mahotsav' from 17th to 19th February at Shivneri | शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत 'हिंदवी स्वराज्य महोत्सव'

शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत 'हिंदवी स्वराज्य महोत्सव'

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त राज्याचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४'चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे.

इतिहासाची साक्ष देणाऱ्या जुन्नर शहरात तीन दिवस कला, संगीत, साहस आणि अध्यात्मविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटक आणि सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. पर्यटनमंत्री महाजन म्हणाले, हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ हा इतिहास, संस्कृती आणि साहस यांचा सुरेख संगम घडवणारा असेल. पर्यटन विभाग गेले वर्षभर आपल्या संस्कृतीवर आधारित वेगवेगळे महोत्सव साजरे करत आहे. आपली स्थानिक संस्कृती, समृद्ध वारसा याची माहिती नव्या पिढीला आणि पर्यटकांना होण्यासाठी महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शिवनेरी फेस्टिवल २०२४ मध्ये विविध उपक्रम

पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश असेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, हस्तकला प्रदर्शन, चवदार आणि मनमोहक अशा पाककृती, कार्यशाळा, क्वाड बायकिंग, पेंटबॉल, तिरंदाजी, गिर्यारोहण, रॅपलिंग, झिपलायनिंग, स्पीड बोटींग, वॉल क्लाईंबिंग अशा साहसी खेळांचा अनुभव, कुकडेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, काशी ब्रह्मनाथ मंदिर, अष्टविनायक मंदिर, लेण्याद्रि मंदिर, ओझर मंदिर, ज्योतिर्लिंग मंदिर, भीमाशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन, निरभ्र रात्री लेकसाईड ग्लँपिंग आणि स्टारगेझिंगचा आनंद अनुभवता येणार आहेत. विविध किल्ल्यांची चढाई करत स्वत:ला आव्हान द्यावे - किल्ले हडसर, निमगिरी - हनुमंतगड, नाणेघाटासोबत जिवधनगड, कुकडेश्वर मंदिरासोबत चावंडगड. दोन दिवसीय गिर्यारोहण स्पर्धेत सहभागी व्हावे, कँपिंगसोबत हरिश्चंद्रगड ट्रेक आणि हडपसर - निमगिरी - हनुमंतगड - नाणेघाट - जिवधन येथे गिर्यारोहण  हा उपक्रम देखील आयोजित केला आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम  व विविध बचतगटांचे प्रदर्शन

या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून हे सर्व कार्यक्रम शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय मैदान, तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे होणार आहेत. दि. १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ रोजी स. १०:०० ते रात्री ०९:०० विविध बचत गटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे प्रदर्शन असेल. दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी, सायं. ०६:३० ते ०७:३० वा. छत्रपतींची मानवंदना शाहीर सुरेश जाधव यांचा पोवाडा पर कार्यक्रम., सायं. ०७:३० ते रात्री ९.३० वा. जाणता राजा (महानाट्य) चे आयोजन. दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ०६:३० ते ०७:३० वा. गर्जा महाराष्ट्र माझा ही नृत्य नाटिका, सायंकाळी ०७:३० ते रात्री ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे दर्शन घडवणारा गनिमी कावा हा कार्यक्रम. दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ शिवजन्मोत्सव सोहळा, सायं. ०६:१५ ते ०७:०० वा. महा शिवआरती कार्यक्रम, सायं. ०६.३० ते ०७:३० वारी सोहळा संताचा (नृत्य), सायं ०८:३० ते ९.३० वा. शिवशंभु शौर्यगाथा-शिव सह्याद्री (महानाट्य) या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Web Title: 'Hindvi Swarajya Mahotsav' from 17th to 19th February at Shivneri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.