मी मुख्यमंत्री असताना स्वीकारलेला अहवाल हा...; त्रिभाषा सुत्रावरून उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 08:44 IST2025-07-19T08:43:43+5:302025-07-19T08:44:13+5:30
मुख्यमंत्री तसे म्हणाले, त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण आम्ही हिंदीची सक्ती सहन करणार नाही. - ठाकरे.

मी मुख्यमंत्री असताना स्वीकारलेला अहवाल हा...; त्रिभाषा सुत्रावरून उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असतानाच हिंदीची सक्ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही, असे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री तसे म्हणाले, त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण आम्ही हिंदीची सक्ती सहन करणार नाही. मी मुख्यमंत्री असताना डॉ. माशेलकर समितीने दिलेला अहवाल हा माझ्या माहितीप्रमाणे उच्च शिक्षणाबाबतचा होता. तो अहवाल आमच्या मंत्रिमंडळाने स्वीकारला. त्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही कार्यगट स्थापन केला, पण त्याची एकही बैठक झाली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदीभाषकांना मारहाण करणे योग्य नाही, त्याचे मी समर्थन करत नाही. राज्यात काही वेगळे घडले की युपी, बिहारची संस्कृती आली असे म्हटले जाते. तेही योग्य नाही. त्या राज्यातही अनेक चांगले लोक आहेत, असेही ते म्हणाले. विधिमंडळाच्या अधिवेशनाने सामान्यांची घोर निराशा केली. सत्ताधाऱ्यांचे समाजकारण नाही तर माजकरण दिसून आले, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
मराठीसाठी एकत्र आलो होतो, मराठीसाठी पुढेही एकत्र राहू
‘मराठीसाठी आम्ही एकत्र आलो होतो’ असे राज ठाकरे यांनी अलिकडेच म्हटले आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, होय! आम्ही मराठीसाठीच एकत्र आलो होतो, मराठीसाठी पुढेही एकत्र राहू. निवडणुकीसाठी एकत्र यायचे का ते निवडणूक आल्यावर ठरवू. त्यावेळी चर्चा होऊ शकते, ती होईलच.
कर्जमाफीचा अभ्यास कशाला?
शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत उपाय सुचविण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी समिती नेमली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, की कर्जमाफीचा अभ्यास कशाला? आम्ही थेट कर्जमाफी दिली होती, अभ्यास वगैरे नाही केला.
आताच्या सरकारची मानसिकता असेल तर लगेच कर्जमाफी द्या. राजकारणाचा इतका दीर्घ अनुभव असलेले सत्ताधारी अभ्यास कशाचा करत आहेत?