महाबळेश्वरात हिमकण पारा खालावला : वेण्णा जलाशय परिसरात पांढरीशुभ्र चादर; पर्यटकांमध्ये कुतूहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:34 IST2018-12-12T00:31:56+5:302018-12-12T00:34:52+5:30
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरात थंडीचा जोर वाढत चालला असून, बुधवारी पहाटे पर्यटकांना हिमकण पाहावयास मिळाले. दवबिंदू गोठल्याने वेण्णा जलाशय परिसरात हिमकणांची चादर पसरली होती.

महाबळेश्वर येथील वेण्णा जलाशय व परिसरात मंगळवारी सकाळी दवबिंदू गोठल्याने जलाशयातील जेटी व वाहनांच्या टपावर हिमकणांची चादर पसरली होती. जलाशयाजवळील गवतावरही हिमकण पाहावयास मिळाले.
महाबळेश्वर : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरात थंडीचा जोर वाढत चालला असून, बुधवारी पहाटे पर्यटकांना हिमकण पाहावयास मिळाले. दवबिंदू गोठल्याने वेण्णा जलाशय परिसरात हिमकणांची चादर पसरली होती. यंदाच्या हंगामात प्रथमच दवबिंदू गोठल्याने पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. अनेक पर्यटकांनी निसर्गाचा हा अनोखा अविष्कार कॅमेऱ्यात कैद केला.
हिवाळा ऋतू सुरू झाल्यानंतर देशभरातील पर्यटकांचे लक्ष महाबळेश्वरकडे वळते. त्याला कारणही तसेच आहे. येथील वेण्णा जलाशय परिसरात दरवर्षी दवबिंदूंचे हिमकणात रुपांतर होते. जलाशय परिसरात सर्वत्र हिमकणांची पांढरीशुभ्र चादर पसरते. गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात होणारे चढ-उतार होत पाहता दवबिंदू गोठण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मंगळवारी ही प्रतीक्षा संपली अन् पर्यटकांना हिमकण पाहावयास मिळाले.
बोटीमध्ये चढ-उतार करण्यासाठी वापरल्या जाणाºया जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचले होते. तसेच रस्त्याकडेला उभ्या असलेल्या गाड्यांच्या टपांवर तसेच झोपड्यांच्या छप्परांवरही हिमकणांची चादर पसरली होती. लिंगमाळा परिसरातील स्मृतीवन परिसर व रानफुलांवरही हिमकण पाहावयास मिळाले.
थंडीच्या हंगामात प्रथमच महाबळेश्वरात दवबिंदू गोठल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. दवबिंदू गोठल्याची माहिती मिळताच पर्यटकांची पावले पहाटे वेण्णा जलाशयाकडे वळाली. अनेकांनी निसर्गाचा हा अविष्कार आपल्या कॅमेºयात कैद केला. हिमकण गोळा करून फोटो काढण्याचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही.
पारा चार अंशांवर येताच दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया
डिसेंबर महिना सुरू झाला की महाबळेश्वरचे तापमान हळूहळू खालावते. शहराचे किमान तापमान जरी १२ ते १३ अंश सेल्सिअस असले तरी वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसराचा पारा ३ ते ४ अंशांवर घसरतो. दवबिंदूंचे हिमकणात रुपांतर होण्यासाठी इतके तापमान पुरेसे आहे. मंगळवारी पारा खालावल्याने दवबिंदू गोठल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली.