१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:51 IST2025-08-06T15:33:04+5:302025-08-06T15:51:48+5:30
विशेष म्हणजे ५ ऑगस्ट रोजी नगरविकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग यांनी हे आदेश एकाच दिवशी काढले.

१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
मुंबई - महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कॉल्ड वॉर सुरू असल्याची कायम चर्चा होत आहे. त्यातच राज्य शासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे या दोन्ही नेत्यांमधील छुपा संघर्ष समोर आला. सरकारने एका पदासाठी एकाच दिवशी २ विभागांकडून २ वेगवेगळे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शासनाचा सावळा गोंधळ दिसून आला आहे.
बेस्ट प्रशासनाचा अतिरिक्त कारभार एकनाथ शिंदे यांनी अश्विनी जोशी यांच्याकडे दिला तर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्याच पदावर आशिष शर्मा यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाच्या या गोंधळामुळे विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर शासनाकडून २ वेगवेगळ्या व्यक्तीची एकाच दिवशी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाने या जागेवर जीएसटी विभागाचे आयुक्त आशिष शर्मा यांची नियुक्ती केली आहे तर एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाने या पदावर अश्विनी जोशी यांची नियुक्ती केली आहे.
विशेष म्हणजे ५ ऑगस्ट रोजी नगरविकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग यांनी हे आदेश एकाच दिवशी काढले. या आदेशामुळे बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार दोन अधिकाऱ्यांना दिल्याचे दिसून येते. याआधी बेस्टचं महाव्यवस्थापक पद एकाच अधिकाऱ्याला दिले जात होते. मात्र आता हा अधिकार दोन अधिकाऱ्यांना दिल्याने गोंधळ उडाला आहे. दोन्ही विभागाने वेगवेगळे आदेश का काढले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत...
एकीकडे महायुती सरकारमधील गोंधळ समोर आला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत गेलेत. शिंदे यांची दिल्लीवारी हा यातील एक चर्चेचा विषय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय स्तरावर सर्वकाही आलबेल नाही अशा चर्चा गेल्या काही दिवसांत सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या बैठकीत महायुती आणि आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे शिंदे म्हणाले.