मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र, राज्यात अद्याप कुठलंही सरकार कार्यरत नसल्याने राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल भगंतसिंह कोश्यारी यांच्याकडेच राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यपालांकडे मागणी केली आहे. याची दखल घेत राज्यपालांनीही शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. 2 हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी 8 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र, ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर, भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी या मदतीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे म्हटले आहे.
महामहिम राज्यपाल यांचेकडून ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली खरीप पिकांना प्रति हेक्टरी 8 हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या जाहीर झालेल्या मदतीतून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार नसल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी 25 हजार रुपये तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी असून त्यात मशागतीचा खर्चही निघणार नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.
राज्यपालांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की,खरीप पिकांसाठी एकरी 3200 रुपये आणि फळबागांसाठी एकरी 7200 रुपये मदत ही तर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच आहे.
पंकजा मुंडेंची प्रतिक्रियाराज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंतच्या खरीप पिकांसाठी 8 हजारांची तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची प्रति हेक्टरी मदत घोषित करण्यात आली आहे. राज्यपालांनी जाहीर केलेल्या या मदतीमुळे अवकाळी पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.