मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरुच आहे. सखोल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्याव लागत आहे. याच पार्श्वभूमीवर चेंबूर येथील वाशिनाका परिसरातील न्यू अशोक नगर येथे संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक- शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन बाधित कुटुंबाशी संपर्क साधला. तसेच त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण भिंतीच्या बाजूला असलेली बंद दोन घरे संरक्षण भिंतीसह खाली कोसळली. त्यामुळे भिंतीच्या खालील बाजूस असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच सना मलिक- शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन बाधित कुटुंबांसाठी तात्पुरते पुनर्वसन व मूलभूत सुविधांची व्यवस्था तातडीने करण्याचे संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. सना मलिक- शेख यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग संपर्क साधला. तसेच अग्निशमन दल आणि आरसीएफ पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण टीम मदतकार्यास तैनात ठेवली आहे.