कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा धुमाकूळ; पुणे-बंगळुरु महामार्ग शिरोळनजीक केला बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 08:28 AM2019-08-06T08:28:15+5:302019-08-06T08:34:43+5:30

पावसामुळे कोल्हापुरातील शाळांना मंगळवार आणि बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Heavy Rain in Kolhapur, Sangli; Stops Pune-Bangalore highway near kolhapur | कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा धुमाकूळ; पुणे-बंगळुरु महामार्ग शिरोळनजीक केला बंद 

कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा धुमाकूळ; पुणे-बंगळुरु महामार्ग शिरोळनजीक केला बंद 

googlenewsNext

पुणे - मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर, सांगलीमध्ये अनेक नद्यांना पूर आला आहे. कोल्हापुराच्या दसरा चौकात पूर्णपणे पाणी साचलं आहे. पंचगंगा नदीला पूर आल्याने पुणे-बंगळुरु हायवेवर पाणी आलं आहे. शिरोळनजीक पुलावर पाणी साचल्याने बंगळुरुकडे जाणारी वाहतूक किणी टोलनाक्याजवळ थांबविण्यात आली आहे. 

पावसामुळे कोल्हापुरातील शाळांना मंगळवार आणि बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराचा फटका बसलेल्या शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आदी सहा तालुक्यांतील पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंचगंगेला पूर आल्याने २०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले. काही गावांतील विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. 

सांगली, साताऱ्यात पूरस्थिती
सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नदीकाठ महापुराच्या मगरमिठीत सापडला आहे. धोकादायक पातळी ओलांडून नद्यांचे पाणी लोकवस्त्यांमध्ये शिरल्याने प्रमुख मार्ग बंद होण्याबरोबर हजारो लोकांच्या स्थलांतराचे काम सुरू झाले आहे. १०७ गावांचा संपर्क तुटला आहे. सांगली-इस्लामपूर मार्ग बंद झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पूरस्थिती आहे. कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय. प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 

२४ जुलै १९८९ रोजी पंचगंगा नदीचे पाणी पंचगंगा रुग्णालयाच्या मारूती मंदिराजवळ आले होते . इथपर्यंत पुराचे पाणी कधीच आले नव्हते.  त्यामुळे महापालिकेने तेथे त्या घटनेची खूण म्हणून एक शिळा लावली. सोमवारी मध्यरात्री त्या ठिकाणी पुराचे पाणी पोहोचले आहे.

तसेच पुरामुळे अनेक अफवांना उधाण आलं आहे. त्यामुळे पूर, पाणी पातळी याबाबत कोणीही अफवा पसरवू नये. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.  
तसेच न्यू पॅलेसमागील सन सिटीमध्ये मध्यरात्री पुराचं पाणी घुसलं आहे, 500 हून अधिक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यामुळे पुरात अडकलेल्या लोकांना बचावकार्यसाठी NDRF च्या दोन तुकड्याही शहरात दाखल झाल्या आहेत. 


 

बेळगावच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली

सतत पडणाऱ्या पावसाने पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने व  तवंदी घाटात दरड कोसळल्याने सोमवार मध्यरात्रीपासून वाहतूक रोखण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर व बेळगावच्या दिशेनें जाणारी शेकडो वाहने मार्गावर अडकली आहेत. यमगर्णीनजीक नवीन पुलावर पाणी आल्याने येथे वाहतूक रोखली आहे. 

दरम्यान  तवंदी घाटात दरड कोसळली असून येथेही वाहतूक रोखली आहे. परिणामी यमगर्णी येथे वाहनांच्या रांगा लागल्या असून या मार्गावरून जाणाऱ्या लोकांना बाहेर न पडण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.  यमगर्णी नवीन पुलावर पाणी येण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे यमगर्णी गावातील काही नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. जत्राट येथील नागरिकांनाही स्थलांतरित करण्यात आले आहे.

Web Title: Heavy Rain in Kolhapur, Sangli; Stops Pune-Bangalore highway near kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.