‘हा’ तर अतिरेकी, मी सही करणार नाही; आव्हाडांनी सांगितला ‘आमदार’कीचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 07:30 IST2021-10-03T07:27:46+5:302021-10-03T07:30:21+5:30
'लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात आव्हाड यांनी ‘लोकमत’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत साधलेल्या संवादात आपला राजकीय प्रवास सांगितला.

‘हा’ तर अतिरेकी, मी सही करणार नाही; आव्हाडांनी सांगितला ‘आमदार’कीचा किस्सा
मुंबई : विधान परिषदेच्या बारा सदस्यांच्या यादीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझे नाव दिले. मात्र तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी माझ्या नावावर सही करायला नकार दिला. त्यांनी सांगितले, हा तर अतिरेकी आहे. मी याच्या नावावर सही करणार नाही. शरद पवार यांनी कारण विचारले तेव्हा राज्यपालांनी सांगितले, याने तर ब्रिच कँडी क्लब फोडला होता. तेव्हा त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली गेली आणि मी आमदार झालो! आजपर्यंत कधीही बाहेर न आलेला हा किस्सा सांगितला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी!
‘लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात आव्हाड यांनी ‘लोकमत’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत साधलेल्या संवादात आपला राजकीय प्रवास सांगितला. त्याचवेळी आपला सतत ‘शरद पवार यांचा चमचा’ म्हणून होत असलेला उल्लेख टाळण्यासाठी जिद्दीने मी विधानसभेत लोकांमधून निवडून आलो, तो माझ्या आयुष्यातील सगळ्यांत मोठा आनंद होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. नारायण राणे त्यावेळी काहीतरी गडबड करणार होते. आपल्या पक्षाचे आमदार फुटणार, त्या बदल्यात त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती शरद पवार यांना मिळाली. याबाबतचा पडद्यामागचा प्रवासही आव्हाड यांनी मांडला. ही संपूर्ण मुलाखत लोकमत यू ट्यूबवर सोबतचा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पाहायला मिळेल.
शरद पवारांबद्दलही सांगितला किस्सा
सुरेश कलमाडी यांनी सर्वप्रथम मला शरद पवार यांच्याकडे नेले. त्यानंतर पद्मसिंह पाटील यांच्यासोबतही माझे चांगले संबंध होते. शरद पवार हे दिल्लीवरून विमानतळावर आले तरी मी त्या ठिकाणी उभा असायचो आणि ते जात असले तरी मी विमानतळावर उभा असायचो. ते कोणत्याही ठिकाणी गेले तरी मी विमानतळावर जायचो. जवळजवळ १२ वर्षे मी हे केले. आधी त्यांचे लक्ष नसायचे; पण त्यांना माझा चेहरा परिचयाचा वाटायला लागला तेव्हा त्यांनी ओळखही देण्यास सुरुवात केली, असे आव्हाड म्हणाले.