Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:21 IST2025-08-11T17:19:44+5:302025-08-11T17:21:23+5:30
Uddhav Thackeray On ECI: इंडिया आघाडीच्या मोर्चावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली.

Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केल्यानंतर, इंडिया आघाडीच्या ३०० खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला. परंतु, पोलिसांनी संसदेच्या आवारातच या मोर्चाला अडवले आणि राहुल गांधी, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांसह अनेक खासदारांना ताब्यात घेतले. यावर ठाकरे गटचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली असून "निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षा मोठे झाले का?" असा कडवट सवाल त्यांनी केला.
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "देशात दिवसाढवळ्या मतांची चोरी होत आहे आणि ती लपवण्यासाठी भाजप आटापिटा करत आहे. निवडणूक आयोग राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? दिल्लीतील केंद्र सरकारने जो तमाशा केला आहे, तो लांच्छनास्पद आहे. ज्या खासदारांनी सरकारला प्रश्न विचारले, त्यांना अटक करण्यात आली. सरकारने स्वतःच लोकशाहीला काळिमा फासला आहे", अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला
राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर, इंडिया आघाडीने आज एक मोठा मोर्चा काढला. त्यानुसार, ३०० खासदारांनी मकर द्वार ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केली. परंतु, पोलिसांनी संसदेच्या आवारातच हा मोर्चा रोखला, ज्यामुळे खासदार आक्रमक झाले. यानंतर, पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले. दरम्यान, काँग्रेसच्या महिला खासदारही चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल्या. अनेक महिला खासदारांनी पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढून निषेध व्यक्त केला. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादवदेखील बॅरिकेट्सवर चढून बाहेर पडले, परंतु त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.