“काँग्रेस हाच भाजपाला सक्षम पर्याय, २०२९ ला देशात काँग्रेसची सत्ता येईल”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 20:43 IST2026-02-27T20:42:03+5:302026-02-27T20:43:12+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: काँग्रेस पक्ष देशात व राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

“काँग्रेस हाच भाजपाला सक्षम पर्याय, २०२९ ला देशात काँग्रेसची सत्ता येईल”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: काँग्रेस पक्ष देशात व राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. काँग्रेस हाच भाजपला पर्याय आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढेल, त्यासाठी जोमाने काम करा. २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी कार्यशाळेचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या प्रशिक्षण कार्यशाळेत तीन दिवस विविध विषयांवर विचार मंथन केले जाणार आहे. कोकण विभागात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
काँग्रेस पक्षाला कोकणात अपेक्षित यश मिळाले नसले तरी...
नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कोकणात अपेक्षित यश मिळाले नसले तरी सरकारी यंत्रणांचा गैरवापर, दडपशाही, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर अशा विपरीत परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या निर्धाराने लढा दिलेला आहे. यापुढे कोकण विभागात काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवण्याचा प्रयत्न करा, असे सपकाळ म्हणाले.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ राज्यघटना दिली आहे. या राज्यघटनेने जात, धर्म, गरिब, श्रीमंत, महिला पुरुष असा भेदभाव न करता सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. भाजपा सरकारच्या कारभारावर टीका करताना दलवाई म्हणाले की, राज्यातील सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत. गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. एकीकडे शिक्षणाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सरकारी रुग्णालयाची अवस्था केविलवाणी झाली आहे. सर्वसामान्य लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेऊ शकत नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पराभवाला न घाबरता लढले पाहिजे, लोकांपर्यंत जा, असे आवाहन माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केले.