हँड्स अप ! 'अब तुम्हारा खेल खत्म', छे... पिक्चर अभी बाकी है, महाराष्ट्रजनहो!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 06:12 PM2019-11-25T18:12:42+5:302019-11-25T18:12:57+5:30

1978 साली खंजीर खुपसणे ही म्हण महाराष्ट्रात गाजली होती. शरद पवारांनी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादांच्या पाठिंत खंजीर खुपसला. तोही यशवंतराव चव्हाण यांच्या संमतीने खुपसला गेला अशी चर्चा तेव्हा रंगली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी जी भूमिका वठवली तिच भूमिका आज शरद पवार वठवताना दिसत आहेत.

Hands up! 'Now your game is over', yes ... the picture is still pending, Maharashtra! | हँड्स अप ! 'अब तुम्हारा खेल खत्म', छे... पिक्चर अभी बाकी है, महाराष्ट्रजनहो!

हँड्स अप ! 'अब तुम्हारा खेल खत्म', छे... पिक्चर अभी बाकी है, महाराष्ट्रजनहो!

googlenewsNext

- राजा माने
मुंबई- हँडसअप! 'अब तुम्हारा खेल खत्तम हो चुका है'..जुन्या सस्पेन्स सिनेमाच्या क्लायमॅक्सला हे अस्सच घडायचं...महाराष्ट्राच्या राजकारणातही अगदी तस्संच घडतंय ना..संपलं, संपलं म्हणत असतानाच...कुणीतरी अचानक टपकतो अन् हँडसअप म्हणतो...पुन्हा खेळ चालूच..कारण पिक्चर अभी बाकी है महाराष्ट्रजनहो!

'हँड्स अप अब तुम्हारा खेल खत्म', हा डायलॉग 1970 च्या काळातील चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये हमखास असायचा. चित्रपटाचा शेवट होणार असं वाटत असताना अचानक विलन येणार अन् डोक्याला बंदूक लावून 'हँड्स अप' म्हणत. त्यानंतर आपला मेंदू शांत होईपर्यंत 'हँड्सअप'चा खेळ चालायचा. या मधल्या काळात नट-नट्या आणि हास्यअभिनेते आपल्या माकडचाळ्यांनी क्लायमॅक्सची मारामारी रंगतदार करायचे. असंच काहीसं महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असल्याचे दिसून येते. 

पूर्वीच्या काळी सस्पेन्स असलेले चित्रपट यायचे. या चित्रपटांमध्ये एखादी डायरी दाखवण्यात यायची. त्या डायरीचा शोध घेण्यावर चित्रपटाची कथा पुढे सरकत जायची. अगदी त्याच डायरीचं स्वरुप आता महाराष्ट्राच्या राजकारणाला आले आहे. ती डायरी म्हणजे महाराष्ट्राच्या विधीमंडळातील संख्याबळ होय. ही डायरी कधी शिवसेना नेते संजय राऊत तर कधी शरद पवार यांच्या हाती लागत केली. आता मध्येच ही डायरी फडणवीसांकडे गेली. या फेकाफेकीत सर्वाधिक काळ डायरी राऊत यांच्याच हातात होती. मात्र कितीही हातचालाखी केली तरी, अखेर ती डायरी शरद पवार यांच्याच हाती लागायची. या डायरीची अवस्था चित्रपटाप्रमाणेच झाली आहे. 

महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा अंक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुरू होईल. परंतु, कथेत फडणवीस आणि अजित पवार यांनी सर्वात रंजक ट्विस्ट आणलं. हे दोघेच या कथेचे सुत्रधार आहेत की, पडद्यामागे आणखी कोणी आहे, हे कळायला मार्ग नाही. यातही महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, अजितदादांना शरद पवारांची मुकसंमती तर नव्हे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी येतो तो मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय मुल्य उरलं का, विचारधारेला, वैधानिक आणि कायद्याच्या चौकटीत महाराष्ट्राचे राजकारण कुठं बसवायचं आणि राज्याच्या राजकारणात शरद पवार, पवार कुटुंबांची भूमिका नक्की काय आहे याभोवती महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती फिरतोय. जुन्या सिनेमात ट्विस्ट येण्यापूर्वी हे घडणार अस वाटत असताना वेगळच काही घडायचं. आज नेमक तेच होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल ही मंडळी रात्रीतून कृती करते, तेव्हा ते कायद्याच्या कसोटीत बसणारीच कृती करतील यात शंका नाही. किंबहुना अजित पवार सारखा नेता आपलं राजकीय भवितव्य एका रात्रीत कसकाय पणाला लावू शकतो, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व घडामोडीचा निष्कर्ष आपण काढल्यास हेच लक्षात येतं की, राज्याची डायरी पूर्वीपासूनच लिहिली गेली आहे. या डायरीसाठी प्रसंगानुसार जो येईल तो म्हणतो, 'हँड्स अप अब तुम्हारा खेल खत्म', परंतु, तो खेळ संपलेला नसतो. तो खेल तेथूनच सुरू होतो, अशाच प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात आपण अनुभवत आहे. 

1978 साली खंजीर खुपसणे ही म्हण महाराष्ट्रात गाजली होती. शरद पवारांनी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादांच्या पाठिंत खंजीर खुपसला. तोही यशवंतराव चव्हाण यांच्या संमतीने खुपसला गेला अशी चर्चा तेव्हा रंगली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी जी भूमिका वठवली तिच भूमिका आज शरद पवार वठवताना दिसत आहेत. शरद पवार आणि माझा काही संबंध नाही, अशी भूमिका यशवंतरावजींनी घेतली होती. अगदी तिच भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. तेही म्हणतात अजित पवार आणि माझा काहीही संबंध नाही. मात्र मुकसंमतीशिवाय किंवा कुठलाही ठोस आधार असल्याशिवाय, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा संघ परिवार अस धाडस करू शकेल का, असा प्रश्न सहाजिकच तुमच्या माझ्या मनात आहे. त्या प्रश्नाचे उत्तर 'ये खेल अब कब खत्म होगा', असं म्हणतच आपल्याला थांबवं लागेल.

Web Title: Hands up! 'Now your game is over', yes ... the picture is still pending, Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.