२२ लाखाचा गुटखा जप्त, बुलढाण्याच्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 20:20 IST2021-02-20T20:20:13+5:302021-02-20T20:20:13+5:30
तालुक्यातील अंतुर्ली फाट्याजवळ एलसीबीच्या पथकाने शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास १६ लाखाचा गुटखा पकडला.

२२ लाखाचा गुटखा जप्त, बुलढाण्याच्या दोघांना अटक
मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली फाट्याजवळ एलसीबीच्या पथकाने शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास १६ लाखाचा गुटखा पकडला. याचबरोबर अवैधपणे वाहून नेणारी पाच लाखाची जीपही जप्त केली असून बुलढाणा जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या जळगाव विभागाला मुक्ताईनगर- बराणपुर रस्त्यावर सुगंधित तंबाखू व सुपारी तसेच गुटख्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. शुक्रवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी अंतुर्ली फाट्याजवळ पोलिसांनी जिप गाडीची ( एमएच २८- बीबी ७५७) या गाडीची तपासणी केली असता यामध्ये विमल गुटखा व सुगंधित गुटका गोनपाटात आढळून आला. किरणकुमार बकाले यांच्या यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित दामोदरे, जितेंद्र पाटील, प्रीतम पाटील, दीपक पाटील, दीपक चौधरी, दीपक शिंदे यांच्या पथकाने सापळा रचला होता.
सदरचा अवैध गुटखा हा माल १६ लाख २२ हजार ७२० रूपयांचा असून जीपची किंमत किंमत पाच लाख रुपये असून असा एकूण २१ लाख २२ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी गोविंदा विश्वनाथ राऊत, गोविंदा सुभाष आखरे (रा. टुनकी तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा) या दोघांना अटक केलेली असून दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. याप्रकरणी एलसीबीचे हवालदार अश्रफ शेख यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.