महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:50 IST2025-12-11T12:47:18+5:302025-12-11T12:50:07+5:30
वेवजी ग्रामस्थांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्र गुजरात सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे.

महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
पालघर - महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील सीमावाद पुन्हा चर्चेत आला आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात वेवजी गावात गुजरातची घुसखोरी सुरू असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सीमेवर असणारे वेवजी गावात याठिकाणी गुजरातकडून हळूहळू सीमांकन वाढवण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोप इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. गुजरातकडून त्यांच्या गावात सीमा वाढवून गाव गिळंकृत करण्याचा डाव आहे असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मागील २५-३० वर्षापासून याठिकाणी सीमावाद आहे.
वेवजी ग्रामस्थांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्र गुजरात सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. या घटनेची दखल घेत आता दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून सीमा मोजणी सुरू करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसिल कार्यालयाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त सीमा मोजणी पार पडते. त्यानंतर गुजरातचं किती अतिक्रमण महाराष्ट्रात आल्याचे हे स्पष्ट होणार आहे. मात्र ऐन हिवाळी अधिवेशनात हा वाद समोर आल्याने मोजणी करून जिल्हा प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मात्र हा सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही राज्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
तर गिफ्ट सिटीच्या माध्यमातून अनेक उद्योग गुजरातला गेले. डायमंड मार्केट गुजरातला नेले आता महाराष्ट्रात अतिक्रमण करण्याचं काम गुजरात सरकारकडून होतंय हे दिसून येते. याआधीच बुलेट ट्रेन आलीच आहे. पालघरमधील या प्रकारात प्रशासनाने तातडीने दखल घेत तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधून भूमिका घ्यावी अशी आमची मागणी आहे. दोन्ही राज्यात भाजपाचं सरकार असल्यानं अधिक काळजी वाटते. त्यामुळे प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
पालघर जिल्ह्यातील वेवजी ग्रामपंचायत महाराष्ट्राच्या हद्दीत येते. मात्र याठिकाणी गुजरातकडून साधारण ६०० ते ७०० मीटर घुसखोरी करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. मागील अनेक दिवसांपासून गुजरात महाराष्ट्र सीमावाद इथे सुरू आहे. १९९७ पासून या दोन्ही राज्यांचा वाद सुरू आहे. स्थानिकांच्या या आरोपानंतर दोन्ही राज्यांच्या जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त सीमा मोजणी हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत इमारती बांधल्या आहेत. त्याठिकाणी रस्ते लाईट अन् इतर सुविधा गुजरातकडून दिल्या जातात त्यातून हा वाद समोर आला.