शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?

By अतुल कुलकर्णी | Updated: May 4, 2025 08:46 IST

परवा कोल्हापुरात भाषण करताना, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते ? मी दिले होते का ? मी तर दिलेले नाही... असे आपण सांगून टाकले ते बरे केले.

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

प्रिय अजितदादा, नमस्कार. ‘एकच वादा, अजितदादा..!’ ही घोषणा महाराष्ट्रात फक्त आपल्याला लागू होते. आपण शब्दाचे पक्के आहात. आपण एकदा शब्द दिला की तो काळ्या दगडावरची पांढरी रेघ ठरतो. “एक बार जब मैंने कमिटमेंट कर ली, तो मै अपने आपकी भी नही सुनता...” हा डायलॉग आपल्यापासून प्रेरित होऊनच सलमान खानने घेतल्याचे जावेद खान यांनी राज ठाकरे यांना सांगितल्याची माहिती आहे. आपण शब्दांचे इतके पक्के मात्र काही नतदृष्ट पत्रकार उगाच आपल्याला त्रास देत राहतात... हल्ली कोणीही येतो आणि कोणत्याही विषयावर आपले मत विचारतो. आपली चिडचिड होणार नाही तर काय..? तसेही आपले आणि पत्रकारांचे संबंध अनेक वर्षांपासून विळा भोपळ्याचे आहेत. विळा भोपळ्यावर पडला काय आणि भोपळा विळीवर पडला काय..? परिणाम एकच...

असो मुद्दा तो नाही. परवा कोल्हापुरात भाषण करताना, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते ? मी दिले होते का ? मी तर दिलेले नाही... असे आपण सांगून टाकले ते बरे केले. जिथे जाईल तिथे पत्रकार आपल्याला हाच प्रश्न विचारत होते. आपण एकदाचे  ठामपणे बोलून हा विषय संपला; मात्र आपल्या विरोधकांना ही गोष्ट हजम होणार नाही. ते आता काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करतील. प्रत्येक जण काही ना काही तरी शोधायचा प्रयत्न करेल. आपल्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या एकाने आम्हाला खा. सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ पाठवला. महायुतीचे सरकार आले की आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे तटकरे त्या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. ती घोषणा तटकरेंनी केली होती. त्याविषयी त्यांनाच विचारा, त्यांचा माझा काही संबंध नाही, असा तत्काळ खुलासा करायला सांगा. म्हणजे जे काय विचारायचे ते तटकरेंना विचारतील. उगाच आपल्या डोक्याला ताप..! पण दादा, विधानसभा निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे आपण आणि देवेंद्र फडणवीस तिघांचे फोटो असलेल्या एकत्रित जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या त्या जाहिरातीत, “केलंय काम भारी... आता पुढची तयारी” अशी घोषणा होती. त्यात “विकासासाठी महायुतीचा शब्द” या मथळ्याखाली ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १५०००’ असे छापलेले होते. त्या जाहिरातीत आपला फोटो आपल्या पक्षाचे चिन्ह होते. आपल्याला अडचणीत आणण्यासाठी तर कोणी हा उद्योग केव्हा केला नव्हता ना... 

शिवाय एक फोटो देखील सर्वत्र व्हायरल होत आहे. त्या फोटोत विविध घोषणांचा एक फलक आपण हातात घेतला आहे. त्या फलकावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे लिहिले आहे. आपण जी बाजू हातात धरली आहे, त्या बाजूने मात्र तसे काही लिहिलेले नाही. आपल्याला खुलासा करायला हा मुद्दा चांगला होईल.

ही सगळी संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आता काहीतरी करावेच लागेल. एक चौकशी समिती नेमून टाका. ही चौकशी समिती येत्या पाच वर्षांत सरकारवर आणि विशेषतः आपल्यावर जे काही आरोप होतील त्या सगळ्या आरोपांची चौकशी करेल. समितीचा कालावधी पाच वर्षांचा ठेवा. पाच वर्षे पूर्ण झाले की समितीने त्यांचा अहवाल द्यावा असे त्यांच्यावर बंधन टाका. म्हणजे पाच वर्षांनंतर एकदाच काय ती उत्तरं देता येतील... खाजगीत सांगायचे तर काल काय जेवलो हे लोकांच्या लक्षात राहत नाही... पाच वर्षांनंतर कोण लक्षात ठेवणार..? मात्र कोणताही आरोप झाला की पंचवार्षिक चौकशी समितीकडे तो आरोप चौकशीसाठी दिला आहे, असे सांगितले की प्रश्न मिटतो..! कशी काय वाटली आयडिया..? तुम्ही आमच्या संपर्कात राहत नाही... नाहीतर अशा खूप आयडिया आम्ही देऊ शकतो...आपल्यालाही मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे आपण आपल्या मनातले बोलला ते ऐकून फार बरे वाटले; पण आपल्या असे बोलण्यामुळे ठाण्यात खळबळ उडाली असे वृत्त आहे. ज्यांच्या नावाची चर्चा होते त्यांना कधीच काही मिळत नाही, असे ठाण्याचे नरेश माध्यमांना सांगत होते. ते असे बोलले की नाही ? आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळणार की नाही ? यासाठी एक एजन्सी नेमून टाका. आपल्याला ज्यांनी गुलाबी जॅकेट घालायला सांगितले होते त्यांना हे काम देऊ नका... ते पुन्हा कुठल्यातरी रंगाचे जॅकेट घालायला सांगतील... निवडणुकीसाठी बनवलेले सगळे गुलाबी जॅकेट आता तसेही तुम्ही घालत नाही... पुन्हा नव्या रंगाच्या जॅकेटचा खर्च उगाच कशाला वाढवायचा..? 

दादा, आपला वादा फार महत्त्वाचा आहे. लोक आपल्याला शब्दाचा पक्का समजतात. तुम्ही स्वतः देखील तसेच सांगता. तेव्हा कर्जमाफीचा शब्द नेमका कोणी दिला होता हे शोधून घ्या आपल्यासाठी ते फार महत्त्वाचे आहे. आपण काकांचा फोटो वापरला म्हणून प्रकरण कोर्टात गेले. फोटो वापरणे बंद करावे लागले. आता कर्जमाफीचा शब्द देताना आपला फोटो आणि आपले घड्याळ जाहिरातीत कोणी वापरले याचा शोध घ्या... नाहीतर उगाच आपल्याला वाईटपणा येईल आणि आपण शब्दाचे पक्के नाही असे होईल... तब्येतीची काळजी घ्या. - तुमचाच, बाबूराव

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी