The Governor rejects the extension, invites power to NCP | महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यपालांनी मुदतवाढ नाकारल्याने सत्तापेच कायम, आता राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण
महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यपालांनी मुदतवाढ नाकारल्याने सत्तापेच कायम, आता राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण

मुंबई : राज्यातील राजकीय पेचप्रसंगात क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, दिवसभराच्या बैठकांनंतरही या नाट्यावर पडदा पडला नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र न मिळाल्यामुळे राज्यपालांनी दिलेल्या सायंकाळी ७.३० या वेळेत शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. आघाडीच्या पाठिंब्याची पत्रे देण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ शिवसेनेने मागितली, पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे पेचप्रसंग तयार झाला असून, राष्ट्रपती राजवट अटळ दिसत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी वेळेत पाठिंब्याची पत्रे न दिल्याने शिवसेनेचा सायंकाळी हिरमोड झाला. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार या बातम्यांमुळे पेढे वाटून जल्लोष करणाºया शिवसेना आमदारांच्या उत्साहावर पाणी पडले. सरकार स्थापन करण्याची तयारी व आवश्यक संख्याबळ आहे का, अशी विचारणा राज्यपालांनी शिवसेनेकडे केली होती. त्यासाठी आज सायंकाळपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेनेने ताकद पणाला लावली. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा मागितला.
त्याच वेळी शिवसेनेचे अरविंद सावंत, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना दिल्लीत भेटले आणि काँग्रेसचा पाठिंबा मागितला. उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा मागण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही फोन केला. त्यानंतर, काँग्रेसची बैठक झाली. सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चाही झाली. मात्र, पुन्हा राष्ट्रवादीशी चर्चा करून आम्ही निर्णय घेणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी बैठकीनंतर रात्री जाहीर केले.
राज्यपालांचे राष्ट्रवादीला पत्र
शिवसेनेला मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपांनी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बोलावून घेतले. तिसरा मोठा पक्ष म्हणून तुम्ही सरकार स्थापन करण्यास तयार आहात का आणि तितके संख्याबळ आहे का, असे विचारणा करणारे पत्र राज्यपालांनी दिले. राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही २४ तासांचा अवधी दिला आहे. त्यावर काय करायचे, याचा निर्णय आम्ही चर्चेने ठरवू, असे नवाब मलिक म्हणाले.
>...आणि शिवसेना ताटकळली
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे अन्य नेत्यांसह राजभवनवर पोहोचले, तेव्हा त्यांच्याजवळ शिवसेना आमदारांच्या सह्याचे पत्र होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र नव्हते. ही पत्रे येतील (फॅक्स वा मेलने) याची प्रतीक्षा करीत शिवसेनेचे नेते राजभवनावर पाऊण तास ताटकळले, पण अखेरपर्यंत पत्रेच आली नाहीत. राज्यपालांशी भेटीनंतर आदित्य यांनी सांगितले की, आमचा सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांनी अमान्य केला नाही, पण त्यासाठी दोन दिवसांची मागितलेली मुदत देण्यास असमर्थता दर्शविली. भविष्यात मित्रपक्षांकडून पाठिंब्याच्या पत्राची प्रत आम्ही राज्यपालांना सादर करू.
>दिल्ली, मुंबईत घडामोडी
सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्या फोननंतर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मात्र, त्यात कोणताही स्पष्ट निर्णय झाला नाही. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण, तसेच बाळासाहेब थोरात आदींना दिल्लीत बोलावून घेतले, तसेच जयपूरमध्ये मुक्कामी असलेल्या काँग्रेसच्या काही आमदारांशी चर्चा केली.
तीन तासांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन बैठका झाल्या. मात्र, काँग्रेस भूमिका स्पष्ट करीत नाही, तोवर आपली भूमिका जाहीर करायची नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीने घेतला. काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगापाल उद्या मुंबईत येऊ न शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
>राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे
राज्यपालांनी आधी भाजपला संधी दिली, पण त्यांनी असमर्थता व्यक्त केली. शिवसेनाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र देऊ शकली नाही. आता राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले आहे. राष्ट्रवादी व नंतर काँग्रेसने असमर्थता व्यक्त केली, तर गुरुवारनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.
>सत्तेसाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येणे गरजेचे
मंगळवारी काँग्रेसशी चर्चा करून आम्हाला शिवसेनेशीही चर्चा करावी लागेल. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, ही काळ््या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे अजित पवार म्हणाले. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात रात्री दूरध्वनीवरून चर्चा झाली.

Web Title: The Governor rejects the extension, invites power to NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.