"बीड, परभणीच्या प्रश्नावर सरकारची भूमिका बोटचेपी, पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचे अभय”, नाना पटोले यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 18:38 IST2024-12-21T18:37:27+5:302024-12-21T18:38:47+5:30

Maharashtra Assembly Winter Session: बीड, परभणीच्या प्रश्नावर सरकारने बोटचेपी भूमिका घेतली आहे. पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचे अभय आहे”, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना केला.  

"Government's role on Beed, Parbhani issue is botched, government's protection for police and Beed goons", alleges Nana Patole | "बीड, परभणीच्या प्रश्नावर सरकारची भूमिका बोटचेपी, पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचे अभय”, नाना पटोले यांचा आरोप 

"बीड, परभणीच्या प्रश्नावर सरकारची भूमिका बोटचेपी, पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचे अभय”, नाना पटोले यांचा आरोप 

नागपूर - बीड आणि परभणीतील घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत, सरकारने गुंडगिरी पोसल्याचे परिणाम बीडमध्येही दिसले. बीड, परभणीच्या प्रश्नावर सरकारने बोटचेपी भूमिका घेतली आहे. पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचे अभय आहे”, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना केला.  

हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, बीड व परभणीतील घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत, सरकारने गुंडगिरी पोसल्याचे परिणाम बीडमध्येही दिसले. पोलिसांमध्येही गुंडाराज आले आहे का? असा प्रश्न पडतो. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले, त्यात अनेकांना जबर मारहाण केली, सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांचा बचाव केला. परभणी प्रकरणात फक्त एका पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. निष्णात वकिलाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणात एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आपली खुर्ची वाचवण्यासाठी मित्रपक्षांच्या मंत्र्यांना घाबरतात असे दिसते, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की,  विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही. गडचिरोलीत विपुल खनिज संपत्ती आहे ती लाडका उद्योगपती लुटत आहे. धारावी प्रकल्प अदानीलाच देण्याचा निर्णय सरकारने केला आहे. अधिवेशनातून सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. भाजपा युती सरकार हे गरीब, तरुण, शेतकऱ्यांचे नाही तर मुठभर श्रीमंताचे आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

दरम्यान, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमवारी परभणीला भेट देणार आहेत. पोलीस लाठीमारात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला ते भेट देणार आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिली.

Web Title: "Government's role on Beed, Parbhani issue is botched, government's protection for police and Beed goons", alleges Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.