महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना निधी देण्यास सरकारची टाळाटाळ, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
By संदीप आडनाईक | Updated: July 12, 2025 11:45 IST2025-07-12T11:44:42+5:302025-07-12T11:45:30+5:30
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन जरी दिले असले तरी ९०० विद्यार्थी अजूनही पूर्ण निधीच्या प्रतीक्षेत

महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना निधी देण्यास सरकारची टाळाटाळ, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
संदीप आडनाईक
कोल्हापूर : बार्टी, सारथीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती पूर्ण दिली, परंतु ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांच्या नशिबी मात्र वनवासच आला आहे. निर्णयानुसार त्यांना केवळ ५ महिने ५ दिवसांचीच अधिछात्रवृत्ती अदा झाली परंतु नोंदणी दिनांकापासून हा निधी देण्यात सरकार गेल्या दोन वर्षांपासून टाळाटाळ करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन जरी दिले असले तरी ९०० विद्यार्थी अजूनही पूर्ण निधीच्या प्रतीक्षेत आहेत.
बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांकडून राज्यातील अनुसूचित जाती, मराठा आणि ओबीसी, भटके विमुक्त या सामाजिक प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी दोन वर्षे सातत्याने आंदोलन करावे लागले. त्यानंतर समान धोरण जाहीर केले.
२५ जुलै २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५० टक्के दराने या तिन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचे जाहीर केले, पण दिले नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी पूर्ण अधिछात्रवृत्तीसाठी पुन्हा तीव्र आंदोलन केले तेव्हा बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण आणि नोंदणी दिनांकापासून रक्कम दिली. त्यात महाज्योतीच्या १४५३ विद्यार्थ्यांनाही लाभ मिळणार होता परंतु अधिछात्रवृत्तीसाठी बराच कालावधी लागल्याने अनेक विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी झाली नाही, त्यामुळे लाभधारकांची संख्या ९०० विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित झाली.
वित्त विभागाकडून निधी नामंजूर
गतवर्षीप्रमाणेच या अधिवेशनातही २०२३ च्या तुकडीतील विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासूनची छात्रवृत्ती देण्यासाठी पाठपुरावा केला पण निधीसाठी केलेली पुरवणी मागणी वित्त विभागाने नाकारली.
आंदोलनानंतर आश्वासन
मुंबईत ३ जुलैला गिरगाव चौपाटीवर शेकडो विद्यार्थ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. त्याची दखल घेत इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासूनची छात्रवृत्ती देण्याचे जाहीर केले. परंतु निधी नसल्याने मुख्यमंत्र्यांसमवेत आठवड्यात बैठक लावण्याचे आश्वासन दिले परंतु निधी मंजूर केला जात नसल्याने महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण लाभ देण्यात सरकार टाळाटाळ करत आहे.
आमच्यासोबत शिकणाऱ्या बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून छात्रवृत्ती दिली परंतु महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना का दिलेली नाही. सरकारन त्यात भेदभाव कशासाठी करत आहे. शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन पाळावे, बैठक लावावी. -सद्दाम मुजावर, संशोधक विद्यार्थी, महाज्याेती.