लाडक्या बहिणींना सरकारचा दिलासा! केवायसी दुरुस्ती करण्याची मुदत वाढवली, आता किती दिवस शिल्लक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:58 IST2026-04-01T18:56:21+5:302026-04-01T18:58:30+5:30
Ladki Bahin Yojana e-KYC latest Updat: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या केवायसी दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली.

लाडक्या बहिणींना सरकारचा दिलासा! केवायसी दुरुस्ती करण्याची मुदत वाढवली, आता किती दिवस शिल्लक?
Ladki Bahin Yojana e-KYC update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या, पण ३१ मार्चपूर्वी केवायसी दुरुस्ती पूर्ण न करू शकलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. आता लाभ घेण्यासाठी महिलांना ३० एप्रिल २०२६ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती बुधवारी दिली.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीनंतर कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेला मुदत वाढ दिली असल्याचे सांगितले.
केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ का देण्यात आली?
एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये तटकरे यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार e-KYC दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे."
केवायसी करण्याची शेवटची संधी
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून केवायसी दुरुस्ती अनिवार्य केली आहे. बोगस लाभार्थी आणि अपात्र लाभार्थींना गाळण्यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून केवायसी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे.
३१ मार्चपर्यंत केवायसी दुरुस्ती करण्याची वेळ सरकारने दिली होती. पण, दिलेल्या कालावधीतनंतरही काही महिला केवायसी दुरुस्ती करू न शकल्याने आता मुदतवाढ दिली गेली आहे. केवायसी दुरुस्तीसाठी ही शेवटची संधी असल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितले.