‘सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न, कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी झाली पाहिजे’, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:48 IST2025-10-30T18:47:57+5:302025-10-30T18:48:35+5:30
Harshwardhan Sapkal News: बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे. महायुती सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

‘सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न, कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी झाली पाहिजे’, काँग्रेसची मागणी
मुंबई - बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे. महायुती सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
बच्चु कडू यांच्या आंदोलनावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरकार कधी पोलिसांना तर कधी कोर्टाला पुढे करून मुख्य मुद्द्यापासून पळ काढत आहे. कोर्टाला पुढे करून सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारमध्ये हिम्मत असेल तर पुढे येऊन चर्चा केली पाहिजे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले व आता कर्जमाफी करण्यास वेळकाढूपणा का केला जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असेल तर हा त्यांचा नाकर्तेपणा आहे, त्यांची पत असेल तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जावून महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणावे, असा सल्लाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
यावेळी मतदार याद्यांमधील घोळ आणि १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाबाबत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत हे काँग्रेस पक्षाने सर्वात आधी पुराव्यासह दाखवून दिले आहे. पण निवडणूक आयोग त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. झोपलेल्या या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार आहे.
मुंबईत आज १ नोव्हेंबरच्या मोर्चाचा अनुषंगाने बैठक आयोजित केलेली होती पण काही वैयक्तीक व घरगुती कामामुळे मी या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही पण काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. १ तारखेच्या मोर्चातही काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार आहे. या बैठकीला वा मोर्चात कोण सहभागी होणार हे गौण असून मुद्दा महत्वाचा आहे, असेही सपकाळ यांनी सांगितले.