एसटी बसस्थानकांवर सरकार स्वच्छता अभियान राबवणार; तब्बल १ कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:13 IST2025-01-22T17:09:23+5:302025-01-22T17:13:37+5:30
राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

एसटी बसस्थानकांवर सरकार स्वच्छता अभियान राबवणार; तब्बल १ कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळणार
St Bus Station: दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान " राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत देण्यात येणार असून राज्यात 'अ ' वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या अभियानाचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी मंत्री सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर सकाळी ११ वाजता होणार आहे. यानिमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
मागील वर्षी हे अभियान सुरू करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची संकल्पना विषद करताना, सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतूक , टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस. टी. महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे, असे स्पष्ट केले होते. तसेच ” आपलं गाव, आपलं बसस्थानक ” या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य ” गाभा ” राहणार आहे. हे देखील आवर्जून सांगितले होते. अर्थात, कोणतेही बसस्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असते. त्याअर्थाने बसस्थानक हे त्या गावची ” शान ” असल्यामुळे गावातील तरुण मंडळे, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या बसस्थानकाचे सुशोभीकरण आणि सौंदर्यींकरणासाठी मदत करावी, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.
वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर ३ महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बसस्थानकाचे क्रमांक निश्चित करण्यात येतील. राज्यभरात एसटीच्या असलेल्या सर्व बसस्थानकाचे तेथील प्रवासी चढ-उतार संख्येच्या आधारे शहरी ‘ अ ‘ वर्ग, निमशहरी ‘ ब ‘ वर्ग व ग्रामीण ‘ क ‘ वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिला आलेल्या बसस्थानकाचा विचार केला जाणार आहे. राज्यपातळीवर ‘ अ ‘वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी रुपये ‘ ब ‘ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला ५० लाख रुपये तर ‘ क ‘ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला २५ लाख रुपये इतक्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.