मुंबई - एकीकडे राज्यातील बहुतांश भागात पुराने थैमान घातले असताना काल अहिल्यानगरमध्ये मुस्लीम धर्मगुरुच्या नावाची रांगोळी काढून विटंबना केल्याने तणाव निर्माण झाला होता. तसेच संतप्त जमावाने रास्तारोको केल्याने पोलिसांना लाठीमार करून जमावाला पांगवावे लागले होते. या प्रकरणी पोलीस तपास आणि कारवाईला सुरुवात झाली असतानाच या हिंसाचारावरून काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल घडवून आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
अहिल्यानगरमध्ये झालेल्या दंगलीवरून गंभीर आरोप करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकीकडे राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगर मध्ये सरकार पुरस्कृत दंगल घडवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. एकीकडे शेतकरी रडत आहे, लोकांची घर गेली, अन्नधान्य, कपडे ,पीक गेली. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे पण कोणी रांगोळी काढावी त्यातून उद्रेक व्हावा , दोन समाजात वाद निर्माण केला जात आहे. जनतेच्या प्रश्नावरून लक्ष भरकटवण्यासाठी या गोष्टी घडवून आणल्या जात आहे, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील पूरस्थितीवरूनही सरकारला जाब विचारला. ते म्हणाले की, राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल २४ जिल्ह्यांतील १३७ तालुके बाधित झाले आहेत. केवळ सप्टेंबर महिन्यातील शेती पिकांचे नुकसान २६ लाख हेक्टरवर गेले आहे. अशा वेळी बँकेकडून शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीची नोटीस कशी काय देण्यात आली? सरकार झोपा काढत आहे का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
अहिल्यानगर, बीड, जालना, सोलापूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ हे जिल्हे सर्वाधिक बाधित झाले आहेत. खरीप हंगामातील सुमारे ५२ लाख हेक्टरवरील पीक पाण्यात गेले असून, खरीप हंगाम तर हातातून निसटला आहेच, परंतु रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी शेतजमीन खरवडून गेल्याने शेतकरी रब्बी हंगामापासून देखील वंचित राहणार आहे.अशा वेळी बँकेकडून कर्ज वसुलीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. सरकारने बँकांना का सूचना दिल्या नाही? शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली थांबली पाहिजे अस वडेट्टीवार म्हणाले.
सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावेत. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. म्हणूनच त्यांना लवकर पुन्हा उभं करण्यासाठी दिवाळीपूर्वीच भरीव मदत केली पाहिजे. अजूनही केंद्राकडून पाहणी करायला पथक आलेले नाही, केंद्राला राज्य सरकारकडून कधी प्रस्ताव जाणार आहे ,मदत कधी मिळणार? असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. वरळी डेअरीची मोक्याची जागा विशेष नियोजन क्षेत्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही जागा अदानींच्या घशात घालण्याचा हा डाव आहे. असे भूखंड विकून शेतकऱ्यांसाठी निधी उभा करता आला असता असे वडेट्टीवार म्हणाले.
Web Summary : Congress alleges Ahilyanagar riots were government-sponsored to divert attention from farmer distress due to heavy rains and crop losses in Maharashtra. Vadettiwar criticizes delayed government response and pending farmer aid.
Web Summary : कांग्रेस का आरोप है कि अहिल्यानगर में दंगे सरकार द्वारा प्रायोजित थे ताकि महाराष्ट्र में भारी बारिश और फसल के नुकसान के कारण किसानों की दुर्दशा से ध्यान भटकाया जा सके। वडेट्टीवार ने सरकार की देरी से प्रतिक्रिया और लंबित किसान सहायता की आलोचना की।