सरकारने मस्तीत वागू नये, ज्या वेगानं सत्तेत आले त्याच वेगाने कोसळणार- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:02 IST2017-09-28T17:01:44+5:302017-09-28T17:02:29+5:30
सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा सरकारची अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे लक्षण आहे.

सरकारने मस्तीत वागू नये, ज्या वेगानं सत्तेत आले त्याच वेगाने कोसळणार- अजित पवार
सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपा सरकार ज्या वेगाने सत्तेत आले आहे त्याच वेगाने कोसळेल असं भाकीत वर्तवलं आहे.
शेतकऱ्याला बोगस म्हणणारे सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आहे. सरकारने जास्त मस्तीत वागू नये. जनता ही मस्ती उतरवू शकते. राज्यकर्त्यांची अशी मग्रुरी राज्याच्या इतिहासात कधी दिसली नाही. राजकारणाची जी संस्कृती महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवारांपर्यंत पाहिली आजचे सत्ताधारी मात्र हा इतिहास कलंकित करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या दडपशाहीवरही जोरदार टीका केली. सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा सरकारची अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे लक्षण आहे. त्यामुळे भाजपा सरकार ज्या वेगाने सत्तेत आले आहे, त्याच वेगाने कोसळेल असं पवार म्हणाले.
भाजपा सरकारच्या धोरणांवर जोरदार देखील त्यांनी टीका केली. जीएसटी आणि नोटबंदीवर टीका करताना ते म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारची धोरणं ही केवळ उद्योगपतींचं भलं करणारी आहेत. राज्यातही सरकारची शेतकऱ्यांबाबतची धोरणं चुकत आहेत असं म्हणत त्यांनी शेतकऱ्याला बोगस म्हणणारे सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आहे. कर्ज घेण्यास शेतकरी अपात्र असू शकतो, पण सात बारा असणारा शेतकरी बोगस कसा असू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.