"सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, फक्त थोडा वेळ लागेल", भाजप नेत्याचं मनोज जरांगेंना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 05:52 PM2023-10-24T17:52:42+5:302023-10-24T17:54:06+5:30

आरक्षणाची घोषणा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"Government positive about Maratha reservation, it will only take some time", BJP leader Girish Mahajan appeals to Manoj Jarange | "सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, फक्त थोडा वेळ लागेल", भाजप नेत्याचं मनोज जरांगेंना आवाहन 

"सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, फक्त थोडा वेळ लागेल", भाजप नेत्याचं मनोज जरांगेंना आवाहन 

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असे म्हणत सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नसल्याचा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. तसेच, आरक्षणाची घोषणा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. आरक्षण देईल तर हेच सरकार देईल. फक्त त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.  नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी, मनोज जरांगे यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. आम्ही न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली समितीचे वेगाने काम सुरु असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. 

मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला थोडा वेळ द्यावा. कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी कायदेशीर आधार द्यावा लागेल. त्यासाठी अजूनही थोडा वेळ लागेल. चर्चा सुद्धा सुरू राहिली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल. पुन्हा उपोषणाला बसून, शरीराला ताण देऊन फार काही उपयुक्तता होणार नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.

याचबरोबर, सरसकट आरक्षणाची काही आवश्यकता नाही. पण मराठवाड्यात त्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समिती अभ्यास करत आहे. अजून किती दिवस लागेल, हे मला सांगता येणार नाही. आमच्या सरकारवर लोकांचा विश्वास आहे. त्याचमुळे आमच्या सरकारच्या काळात मोर्चे निघत आहेत. सरकार त्याची दखल घेत आहे. मात्र, याबाबतीत तोडगा काढायला थोडा वेळ लागेल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. 

सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नाही, जरांगे-पाटील यांचा इशारा
दसऱ्याचे औचित्य साधून अहमदनगरच्या चौंडी येथे धनगर समाजाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. असे म्हणत सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नसल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, जरांगे-पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी आज संध्याकाळपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने आज संध्याकाळपर्यंत आरक्षण दिले नाही तर त्यांनी आमच्या दारातही यायचं नाही, असेही स्पष्टपणे त्यांनी सांगितले.
 

Web Title: "Government positive about Maratha reservation, it will only take some time", BJP leader Girish Mahajan appeals to Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.