राेहा येथे उभारणार सरकारी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 04:25 AM2021-02-13T04:25:37+5:302021-02-13T04:25:57+5:30

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत; प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

Government Pharmacology College to be set up at Raeha | राेहा येथे उभारणार सरकारी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय

राेहा येथे उभारणार सरकारी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय

Next

रायगड :  जिल्ह्यात सरकारी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय पदविका आणि पदवी अभ्यासक्रमासह सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राेहा तालुक्यात सरकारी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय सुरू करण्याबाबतचे पहिले पाऊल पडल्याचे बाेलले जाते. 

या महाविद्यालयामुळे काेकणातील तरुणांना याचा सर्वाधिक फायदा हाेणार आहे. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत समिती गठीत करुन या नियोजित महाविद्यालयाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, अशीही त्यांनी सूचना केली.

रोहा तालुक्यातील कोलाड येथे सरकारी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय उभारण्यासाठी सुमारे ५ एकर सरकारी जमीन उपलब्ध आहे. त्यानुसार रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जमीन प्रदान करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. लवकरच प्रकल्प समितीमार्फत या जागेची पाहणी करण्यात येणार आहे.  कोकण विभागामध्ये समाविष्ट असलेल्या प्रदेशाकरिता भौगोलिकदृष्ट्या रायगड जिल्हा हा मध्यवर्ती जिल्हा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक , मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जलमार्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये दळणवळणाचे व्यापक जाळे निर्माण झाले आहे. याप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. तसेच तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

शैक्षणिक संकुले झाली विकसित
रायगड जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरण, नागरीकरण, पर्यटन आदी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. तसेच जिल्ह्यामध्ये विविध शैक्षणिक संस्थामार्फत अनेक शैक्षणिक संकुले विकसित झाली आहेत. त्यामध्ये कला, वाणिज्य, शास्त्र, वैद्यकीय, अभियांत्रिकी यांच्यासह अन्य तत्सम शाखांच्या महाविद्यालयांचा आणि विद्यापीठांचा समावेश आहे.  

Web Title: Government Pharmacology College to be set up at Raeha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.