सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला: अजित नवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 15:21 IST2019-12-28T15:15:23+5:302019-12-28T15:21:33+5:30
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांवर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज आहे. त्यामुळे सरकारच्या या अटीमुळे हे सर्व शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे.

सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला: अजित नवले
मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 चा अध्यादेश काढला आहे. मात्र या कर्जमाफीच्या योजनेत व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत केलेला हा विश्वासघात असल्याची टीका शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कर्जमाफीची घोषणा सुद्धा केली. मात्र 2 लाखांपर्यंत कर्जाची रक्कम असलेल्या शेतकऱ्यांच या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याची अट सरकारने घातली आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर शेतकरी नेत्यांनी सुद्धा या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे..
सरकारच्या कर्जमाफीबद्दल बोलताना नवले म्हणाले की, राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांवर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज आहे. त्यामुळे सरकारच्या या अटीमुळे हे सर्व शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. तर मुख्यमंत्र्यांकडून ही योजना कोणत्याही अटीशर्तींची नसेल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मागील योजनेच्या बहुतांश सर्वच अटी शासनादेश काढताना जशा होत्या तशाच यावेळीही असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत केलेला हा विश्वासघात असल्याची टीका नवले यांनी सरकारवर केली आहे.