विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 06:46 IST2025-08-06T06:46:02+5:302025-08-06T06:46:41+5:30
प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक तसेच कृषी माल थेट समुद्रमार्गे जाण्यास मदत होईल. तसेच मुंबई व आसपासच्या गर्दीच्या रस्त्यांवरून वळसा घ्यावा लागणार नाही.

विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
मुंबई : वाढवण बंदर आणि समृध्दी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथे जोडण्यात येणार आहे. या १०४ किलोमीटरच्या महामार्गास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक तसेच कृषी माल थेट समुद्रमार्गे जाण्यास मदत होईल. तसेच मुंबई व आसपासच्या गर्दीच्या रस्त्यांवरून वळसा घ्यावा लागणार नाही.
महामार्ग कुठून जाणार?
हा महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे. यामुळे ७८ किमी अंतराची बचत होणार आहे. वाढवण बंदर ते भरवीर हा प्रवास सद्याच्या ४-५ तासावरून १ ते दीड तासावर येईल.
८२ किमी लांबीचा अनावश्यक प्रवास
समृध्दीवरुन वाढवण बंदराकडे जाण्याकरीता भरवीर-आमणे (समृध्दी महामार्ग) ते वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरून जावे लागते. त्यामुळे ८२ किमी लांबीचा अनावश्यक प्रवास करावा लागतो. बंदराच्या भविष्यातील वाहतूक वर्दळीचा विचार करता विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील वाहतूक वर्दळीस उपयुक्त अशा महामार्गाची निर्मिती अत्यंत आवश्यक आहे.
हा प्रकल्प एमएसआरडीसीच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार असून त्यासाठी हूडकोकडून १५०० कोटींचे कर्ज उभारण्यात येणार आहे. या कर्जासह २ हजार ५२८ कोटींच्या तरतूदीस बैठकीत मान्यता दिली आहे.
हा होईल लाभ : दळणवळण गतीमान झाल्याने पालघर, नाशिक जिल्ह्यांमधील लघू, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था, शिक्षणसंस्था, आयटी कंपन्या, कृषी उद्योग केंद्रांना
याचा लाभ होणार आहे. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.