राज्यातील अंगणवाडी मदतनीसांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 08:32 PM2023-10-27T20:32:46+5:302023-10-27T21:01:13+5:30

राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले. 

Good news for Anganwadi helpers in the state, Chief Minister Eknath Shinde's big announcement | राज्यातील अंगणवाडी मदतनीसांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांसाठी आनंदाची बातमी आहे. अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले. 

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित 'प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, आदी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, नवरात्र संपल्यानंतर मातेला वंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये महिलांना आरक्षण देवून त्यांचा सन्मान केला आहे. ग्रामीण भागातील महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने त्यांनी स्वच्छ भारत ही मोहीम राबवून घरोघरी लाखो शौचालयांची निर्मिती केली. महिला समर्थ होतील, तरच देशाची प्रगती होईल, हे ओळखून प्रधानमंत्री देशातल्या दीन दलित, दुर्बल महिलांना स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे करीत आहेत. ग्रामीण भागात लाखो महिलांच्या नावाने घरे करण्यासाठी पीएम आवास योजनेतील घरांवर महिलांची नावे आली आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतिहासात पहिल्यांदाच पोषण ट्रॅकर सुरु करून करोडो मात- मुलांना योग्य रीतीने पोषणाची सेवा मिळते किंवा नाही याची तपासणी सुरु केली. गेल्या दीड वर्षात राज्य शासनानेही महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' ही योजना राबवित असून १ एप्रिल २०२३ नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. प्रधानमंत्री यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात 'नमो ११ कलमी कार्यक्रम' राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित'सारख्या योजनेत एक कोटी ४० लाख महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ३० लाख ४० हजार उद्दिष्ट्य असताना सुमारे ३५ लाख महिलांना लाभ देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे नवीन पोर्टल, मोबाईल अॅप, ऑनलाईन बेनिफिटचा शुभारंभ सुरू केला. दोन कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार असून बचत गटांना सक्षम करण्यासाठी पदार्थांच्या विक्रीसाठी योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वर्षाला सहा हजार दिले जात आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे बळकटीकरण करण्याचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल - स्मृती इराणी
केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. आपदग्रस्त महिलांसाठी राज्यांमध्ये ४० पेक्षा जास्त वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून ३८ हजार संकटग्रस्त महिलांना मदत झाली. राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Good news for Anganwadi helpers in the state, Chief Minister Eknath Shinde's big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.