दहीहंडी आधी खुशखबर! दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:44 IST2025-07-17T19:41:53+5:302025-07-17T19:44:38+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा विभागाला दिले निर्देश

दहीहंडी आधी खुशखबर! दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला दहिहंडीचा सण महिन्याभरावर आला आहे. सर्व गोविंदा पथके जोरदार तयारीला लागली असून त्यांचा सराव सुरू आहे. अशातच महाराष्ट्र सरकारकडून गोविंदांना एक खुशखबर मिळाली आहे. शासनाकडून गोविंदांना मिळणाऱ्या विमा कवचात वाढ करुन ते सुमारे दीड लाख गोविंदांना देण्यात यावे, अशी मागणी करत आज दहिहंडी समन्वय समितीने मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, गीता झगडे आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचे निर्देश दिले.
महाराष्ट्र शासनाने दहीहंडी या खेळाला साहसी दर्जा दिल्यापासून दहीहंडीच्या या खेळामध्ये अनेक गोविंदांचा सहभाग वाढला आहे. त्याच बरोबर या खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा धोकाही वाढलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मागील दोन वर्षापासून ७५,००० गोविंदांसाठी विमा कवच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी यावर्षी यामध्ये वाढ करुन १,५०,००० गोविंदांना विमा कवच मिळावे, अशी मागणी करत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि क्रीडा विभागाला मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.