सायबर फसवणुकीत ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:02 IST2025-10-04T12:00:22+5:302025-10-04T12:02:00+5:30
‘सायबर जनजागृती महिना ऑक्टोबर २०२५’ या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलिस मुख्यालयात शुक्रवारी झाले.

सायबर फसवणुकीत ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबई : “रस्ते अपघातात जसा ‘गोल्डन अवर’ प्राण वाचवू शकतो, तसाच सायबर फसवणुकीतही हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरतो,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सायबर फसवणूक लक्षात येताच तातडीने १९३० किंवा १९४५ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
‘सायबर जनजागृती महिना ऑक्टोबर २०२५’ या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलिस मुख्यालयात शुक्रवारी झाले. यावेळी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी, आयआयटी मुंबईचे प्रा. मंजेश हनवाल, ‘व्हीजेटीआय’चे डॉ. फारूक काझी, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “ डिजिटल युगात सायबर गुन्हे टाळणे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय)च्या वापरामुळे फिशिंग, ओटीपी फसवणूक, डीपफेक, आवाज व चेहरा क्लोनिंग अशा नवीन तंत्रांचा गैरवापर करून सामान्य लोकांना फसवले जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कुकीज स्वीकारल्यानंतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. यावरून स्कॅम, खंडणी, सायबर बुलिंग यांसारखे प्रकार घडतात. राज्यात सायबर सिक्युरिटी लॅब्स, प्रतिसाद केंद्रे आणि रेग्युलेटरी यंत्रणा स्थापन करण्यात आल्या आहेत. डिजिटल फिंगरप्रिंटमुळे प्रत्येक सायबर गुन्ह्याचा मागोवा घेणे शक्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सायबर योद्धा कॉमिक बुकलेटचे प्रकाशन
रश्मी शुक्ला म्हणाल्या , रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत प्रमुख रेल्वेस्थानकांवर सायबर सुरक्षेच्या सूचना दिल्या जात आहेत. महाराष्ट्र पोलिसही सोशल मीडियावर आणि प्रत्येक जिल्ह्यात सायबर जनजागृती करत आहेत. या कार्यक्रमात ‘सायबर सुरक्षा’विषयक माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. ‘सायबर योद्धा’ या लहान मुलांसाठीच्या कॉमिक बुकलेटचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी जनजागृतीसाठी काम करणाऱ्या ‘सायबर वॉरियर्स’चा सत्कारही करण्यात आला.