शेतकऱ्यांसाठी देव धावले! दोन प्रमुख देवस्थानांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला कोट्यवधींचे दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:26 IST2025-09-29T12:25:10+5:302025-09-29T12:26:21+5:30
शेगावचे संत गजानन महाराज आणि पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या राज्यातील दोन महत्त्वाच्या देवस्थानांनी त्यांच्या दानपेटीतून दोन कोटी ११ लाख रुपये राज्यातील पूरग्रस्त शेतकरी व कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री निधीला देण्याची घोषणा केली.

शेतकऱ्यांसाठी देव धावले! दोन प्रमुख देवस्थानांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला कोट्यवधींचे दान
मुंबई : सढळ हाताने देवाच्या चरणी दिलेलं दान हे सत्कर्मासाठीच कामी यावं ही श्री भक्तांची अपेक्षा असते. शेगावचे संत गजानन महाराज आणि पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या राज्यातील दोन महत्त्वाच्या देवस्थानांनी त्यांच्या दानपेटीतून दोन कोटी ११ लाख रुपये राज्यातील पूरग्रस्त शेतकरी व कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री निधीला देण्याची घोषणा केली.
गजानन महाराज संस्थानकडून १.११ कोटी
शेगाव (जि. बुलढाणा) येथील विदर्भातील शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थानतर्फे तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आली. ही रक्कम संस्थानच्या वतीने २७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून १ कोटी
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत व त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांना ‘श्रीं’च्या प्रसादरूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.