मुंबई - भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले संवर्धन आणि देखाभाल व दुरूस्तीसाठी राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडे देण्यात यावेत, अशी विनंती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या बलाढ्य इतिहासाची साक्ष देणारे महाराष्ट्रात ५४ गड किल्ले हे केंद्र संरक्षित असून, ६२ गडकिल्ले राज्य संरक्षित किल्ले आहेत. या किल्ल्यांचे संरक्षण व जतन तसेच देखभाल व दुरूस्तीसाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. जर हे सगळे किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारित दिल्यास त्यांची डागडुजी आणि देखभाल अत्यंत प्रभावीपणे करता येईल, म्हणून हे किल्ले राज्य शासनाकडे देण्यात यावेत अशी विनंती आशिष शेलार यांनी केली आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आपल्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात पॅरिस येथे जाऊन आले आहे. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राचे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय हे वारसा संवर्धनातील विशेष तज्ज्ञ आणि पॅनेल केलेले कंत्राटदार आणि वास्तुविशारदांच्या माध्यमातून संवर्धनाचे काम प्रभावीपणे करू शकते. तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन काम करीत असून, काही खाजगी संस्थांकडून सीएसआरमधून निधीही शासनास उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे आमच्या इतिहासाची साक्ष देणारे हे किल्ले जतन करणे आमचे कर्तव्य आहे. आमच्यासाठी हे अभिमानाचे कार्य ठरू शकते. त्यामुळे हे किल्ले भारतीय पुरातत्त्व विभागाकडून महाराष्ट्र सरकारकडे किल्ले हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आपण द्यावेत, अशी विनंती आशिष शेलार यांनी केली आहे.