Devendra Fadnavis: मोहित कंबोज, गोपीचंद पडळकरांना सुरक्षा द्या; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 15:42 IST2022-03-02T15:42:10+5:302022-03-02T15:42:29+5:30
सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर हल्ले होणार असतील त्यांना सुरक्षाही द्यायची नाही असं कसं चालेल. सुरक्षा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis: मोहित कंबोज, गोपीचंद पडळकरांना सुरक्षा द्या; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी
मुंबई – मागील अनेक दिवसांपासून भाजपा नेते गोपीचंद पडळकर, मोहित कंबोज यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. मध्यंतरी गोपीचंद पडळकर यांच्यावर आटपाडी येथे हल्ला झाल्याचीही घटना घडली. त्यानंतर आता नवाब मलिकांना टार्गेट केल्यामुळे भाजपा नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. त्यामुळे भाजपाच्या आमदार-खासदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही भाष्य केले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांचे काळे कारनामे उघड केले म्हणून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तशा धमक्याही त्यांना मिळत आहे. गोपीचंद पडळकर सरकारविरोधात बोलतात म्हणून त्यांच्यावर हल्ला करायचा, जीवे मारण्याचा प्रयत्न करायचा हे आम्ही बघितलं आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर हल्ले होणार असतील त्यांना सुरक्षाही द्यायची नाही असं कसं चालेल. सुरक्षा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोहित कंबोज, गोपीचंद पडळकरांना संरक्षण द्यावं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची मागणी @Dev_Fadnavis@mohitbharatiya_@GopichandP_MLCpic.twitter.com/pShfOTTphW
— Lokmat (@lokmat) March 2, 2022
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून तसेच विविध प्रश्नांवरून आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) हे महाविकास आघाडीवर सातत्याने आरोप करतात. पडळकर यांनी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केल्यानं त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्ते संतप्त असतात. गोपीचंद पडळकरांवर हल्ला झाला होता तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतही हा मुद्दा लावून ठरला. हिवाळी अधिवेशनात फडणवीस म्हणाले होते की, विधान मंडळाच्या सदस्याचा जीव धोक्यात आहे. सरकारमधले विचारतात पोलीस सुरक्षा कशाला घेता. मला त्यांना विचारायचे आहे, पोलीस त्यांच्या बापाचे आहेत का? आम्हाला हा महाराष्ट्र ठेवायचा आहे, पश्चिम बंगाल करायचा नाहीय. एका आमदाराचा जीव जात असताना आम्ही शांत बसू शकत नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता.
तर आता मोहित कंबोज यांनी नवाब मलिक, संजय राऊत यांच्याविरोधात बोलत असल्याने त्यावरून भाजपा आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यास सुरूवात केली आहे. मोहित कंबोज भारतीय हे गेले काही दिवस सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना २०२० साली पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पण ते अचानक काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे मोहित कंबोज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने आपण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीनं त्यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी भाजपा आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे(CM Uddhav Thackeray) पत्राद्वारे केली आहे.