"माझ्या ताब्यात 'ईडी' द्या, मग दाखवतो सगळ्यांना"; उदयनराजे बेधडक बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 15:41 IST2022-04-27T15:36:12+5:302022-04-27T15:41:24+5:30
बेधडक आणि रोखठोक विधानांनी नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेणारे खासदार उदयराजे भोसले यांनी आता थेट सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) सुत्रंच आपल्या हाती देण्याची मागणी केलीय.

"माझ्या ताब्यात 'ईडी' द्या, मग दाखवतो सगळ्यांना"; उदयनराजे बेधडक बोलले!
सातारा-
बेधडक आणि रोखठोक विधानांनी नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेणारे खासदार उदयराजे भोसले यांनी आता थेट सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) सुत्रंच आपल्या हाती देण्याची मागणी केलीय. "या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ईडी द्या, मी दाखवतो या सगळ्यांना. सारखे सारखे ईडी म्हणजे काय चेष्टा झालीय. पानपट्टीवरील बिडी मिळते ना तशी ईडीची अवस्था झालीय. या सर्वांना ताब्यात घ्या आणि चाप लावा सगळे सरळ होतील. दांडक्याने सडकून काढलं पाहिजेत", असं रोखठोक विधान उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.
राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत उदयनराजे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला. "सध्याची परिस्थिती इतकी कुणी बिघडवली याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला सांगतो माझं आवडतं कार्टुन 'टॉम अँड जेरी' हे सुद्धा बघायचं मी बंद केलंय. आता सध्या सुरू असलेल्या राजकारण्यांच्या माकड उड्या बघत बसतो. खूप मजा येते. कोण-कोणाला आत टाकतंय. कोण कोणाला मारतंय. काय बोलणार आता यावर", असं उदयनराजे म्हणाले.
"काही लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. त्यामुळे माझ्या हातात ईडी द्या. मग मी दाखवतो या सगळ्यांना. सध्या ईडी म्हणजे चेष्टा करुन ठेवलीय. पानटपरीवर बिडी मिळतेय ना तशी ईडीची अवस्था झालीय. मी तर म्हणतो यांना ताब्यात घ्या. चाप लावा सगळे सरळ होतील. एका बाजूला लोक कसे जगत आहेत आणि हे मात्र एकमेकांची पाठ थोपटून जगत आहेत. दोन वर्ष जे जेलमध्ये होते त्यांनी काही केलेलं नाही. आता जे जेलमध्ये आहेत त्यांनीही काय केलेलं नाही. मग काय लोकांना डोळे, मेंदू नाहीत असं वाटतंय काय? लोक आता हसतात. आता निवडणुका लागल्या तर ही मंडळी कशी उभी राहणार आहेत हे त्यांचं त्यांनाच माहित", असंही उदयनराजे म्हणाले.