भारत जोडो यात्रेत सहभागी अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या, नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:54 IST2024-12-20T18:52:16+5:302024-12-20T18:54:05+5:30
Nana Patole's letter to the Chief Minister Devendra Fadnavis: भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या त्या अर्बन नक्षली संघटनांची व त्या संघटनेच्या प्रमुखांची यादी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

भारत जोडो यात्रेत सहभागी अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या, नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत समाविष्ट झालेल्या विविध संघटना राज्याच्या व लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्या व अर्बन नक्षलवाद माजवणाऱ्या होत्या, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावरील केला आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या त्या अर्बन नक्षली संघटनांची व त्या संघटनेच्या प्रमुखांची यादी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रात विविध सामाजिक संघटना अनेक वर्षांपासून समाजोपयोगी कामे करत असून राज्यातील गोरगरिब व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करत आहेत. राज्यात व देशात लोकशाही भक्कम व्हावी यासाठी अशा संघटना कार्यरत आहेत. अशा सामाजिक संघटनांसह विचारवंत, ज्येष्ठ नागरिकही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. अशा संघटनांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नक्षलवादी संबोधणे अत्यंत चुकीचे आहे. भारत जोडो यात्रेला संघटनांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली त्या विविध संघटनांचे दाखले देत त्या संघटना नक्षलवादी आहेत असे संबोधले त्या संघटना व संघटना प्रमुखांची यादी आम्हाला द्यावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांंधी यांनी काढलेल्या भारत जोडो अभियानात सहभागी झालेल्यापैकी ४० संघटना या नक्षलवाद्यांनी फ्रंटल संघटना म्हणून ‘नेम’ केलेल्या आहेत. २०१२ मध्ये ज्या फ्रंटल संघटनांना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘नक्षल संघटना’ म्हणून घोषित केले होते, या त्याच संघटना आहेत. निवडणुकीत परकीय शक्तींचा हस्तक्षेप होत असून टेरर फंडिंगचाही वापर झाला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना केला होता.