तिकीट कापल्याचे संकेत, खडसेंच्या उमेदवारीबाबत गिरीश महाजन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 09:02 PM2019-10-02T21:02:20+5:302019-10-02T21:03:57+5:30

तसेच लेवा पाटीदार समाजाचा आग्रह असून नाथाभाऊंना तिकीट न दिल्यास समाज नाराज होईल ?

Girish Mahajan said that Eknath Khadse's candidacy about muktainagar in BJP | तिकीट कापल्याचे संकेत, खडसेंच्या उमेदवारीबाबत गिरीश महाजन म्हणाले...

तिकीट कापल्याचे संकेत, खडसेंच्या उमेदवारीबाबत गिरीश महाजन म्हणाले...

Next

मुंबई - मी उद्या उमेदवारी अर्ज भरतोय, परवा शेवटची तारीख आहे. त्यानंतर माझ्या मतदारसंघासह महाराष्ट्रात मी प्रचारासाठी जाणार आहे. मुक्ताईनगर मतदारसंघाबद्दल मला माहिती नाही, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीचे आमचे नेतेच याबाबत निर्णय घेतील. पक्ष याबाबत योग्य तो निर्णय घेईल आणि नाथाभाऊ जे नाव सूचवतील ते असू शकतं, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. त्यामुळे भाजपाच्या यादीचीच प्रतीक्षा आता महाराष्ट्राला लागली आहे. 

भारतीय जनता पक्षाला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या साथीने राज्यात वाढविण्याच काम भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं. गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकनाथ खडसेंनी पक्षाचं काम निष्ठेनं केलं. प्रामाणिकपणे जबाबदारीही पार पाडली. पण, 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिलं आहे. याबाबत गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, नाथाभाऊ सूचवतील त्या कुणाचंही नाव असू शकतं, असे म्हणत कदाचित एकनाथ खडसेंचं नाव भाजपाच्या दुसऱ्या यादीत नसल्याचे संकेतच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

तसेच लेवा पाटीदार समाजाचा आग्रह असून नाथाभाऊंना तिकीट न दिल्यास समाज नाराज होईल ? याबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर, प्रत्येक निर्णयाने कुणी ना कुणी नाराज होतच असतो. उद्या मला तिकीट न मिळाल्यास माझा समाजही नाराज होईल, कुणाच्याही समाजाला नाराज वाटणारचं, असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना उमेदवारी नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने 125 जणांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे, एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गजांचे नाव पहिल्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यातच मुक्ताई नगर मतदारसंघातून भाजपा नेते एकनाथ खडसेंनी यादीत नाव घोषित होण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, एकनाथ खडसेंचे नाव दुसऱ्या यादीतही नसल्याची माहिती पुढे येत आहे. 

मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे प्रतिनिधित्व करतात. 2014 मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र जमीन घोटाळ्याच्या आरोपावरुन एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. तेव्हापासून एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळापासून दूर ठेवलं जात आहे. अशातच यंदाच्या निवडणुकीच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव नसल्याने खडसेंना उमेदवारी मिळणार का? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंचं नाव नाही, खडसेंऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून तिकीट देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या खडसेंना पुन्हा एकदा पक्षाने डावललं असल्याचं बोललं जातं आहे. 
 

Web Title: Girish Mahajan said that Eknath Khadse's candidacy about muktainagar in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.