गिरीश बापट या ‘शकुनीमामा’ने पुणे जिल्ह्यात शिवसेनेला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 12:12 IST2019-11-05T12:07:52+5:302019-11-05T12:12:35+5:30
‘शिवसेनेने ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजे.

गिरीश बापट या ‘शकुनीमामा’ने पुणे जिल्ह्यात शिवसेनेला संपवले
चाकण : ‘‘खासदार गिरीश बापट या शकुनीमामाने पुणे जिल्ह्यात शिवसेनेला संपवलं,’ अशी घणाघाती टीका माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण (ता. खेड) येथे केली.
चाकण येथील एका मंगल कार्यालयात खेड तालुका शिवसेनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आढळराव पाटील म्हणाले, ‘खासदार गिरीषबापट म्हणजे पुणे जिल्ह्यातील शकुनीमामा आहेत. या शकुनीमामाने शिवसेनेला संपवले. पालकमंत्र्यांना मी पत्र द्यायचो, पण मला त्यांच्याकडून कोणताच रिप्लाय येत नव्हता. मात्र काम मंजूर झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, सरपंच पदाधिकारी यांच्या नावाने पत्र द्यायची. अशा प्रकारे यांनी जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचे काम केले.
.............
पराभव होऊन देखील पुन्हा लढण्याची ताकद म्हणजे निर्धार मेळावा. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यात त्यांच्या छाताडावर बसून खासदार राहिलो. आज मी ऐशो अरामचे जीवन जगू शकतो, पण नाही माझ्यासाठी जीवाचे रान करणाºया कार्यकर्त्यांसाठी मला लढायचं आहे. त्यांना येणाºया निवडणुकांत त्यांना ताकद द्यायची आहे. शिरूरमध्ये माऊली कटके निवडणुकीला उभे राहिले होते. बाबुराव पाचर्णे यांचा जीव खालीवर झाला. बापट यांच्या सांगण्यावरून माऊली कटके यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतला. पण नंतर बापट यांना फोन केला की, खेड मधून तुमच्या अतुल देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्या, असे सांगितले तर उत्तर आले, अतुल देशमुख यांचा अन माझा संपर्क होत नाही. आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो असे सांगितले. वाशेरे-नायफड व पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटात शिवसेनेला तिसºया क्रमांकाची मते मिळाली, हे चिंताजनक आहे.
............
* बापट समर्थकांचे प्रत्युत्तर
भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे बहुदा महाराष्ट्रातले पाहिले जनसंपर्क कार्यालय चालू करणारे गिरीश बापटच होते. कसबा मतदारसंघ आणि पुणे शहरात भाजप आणि शिवसेना कार्यकर्ता जर कोणी एकत्र बांधून ठेवला तो बापट यांनीच. त्यामुळे आपल्या पराभवाचे खापर बापट यांच्या माथी मारून आपण आपल्या मतदारसंघातली नाराजी लपवू नका. पुणे शहराचे लोकप्रिय खासदार ’ गिरीश बापट हे शकुनीमामा नाहीत तर पश्चिम महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. शिवाजी आढळराव पाटील यांना त्यांचा गड मजबूत करता आला नाही. ते स्वत: पराभूत झाले. बापट हे ३ लाख २४ हजार मतांनी निवडून आलेत. त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी फक्त एका जागेवर भाजपाचा उमेदवार पराभूत झाला आहे,’ असे प्रत्युत्तर बापट समर्थकांनी दिले आहे.